कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने विविध नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. ही अंमलबजावणी ग्रामीण भागात गावपातळीवर राबविणे गरजेचे असल्याने याकरिता गावपातळीवरील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यासोबतच ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती. ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी प्रशासनाचे प्रत्येक नियम काटेकोरपणे राबवित असताना त्यांनाही कोरोना होण्याची भीती वाटत होती. फ्रंटलाईनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य सेवक व महसूलच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण हे लवकर करण्यात आले. मात्र ग्रामसेवक व कृषी विभागातील कर्मचारी यांच्याकडे लसीकरणाबाबत आरोग्य यंत्रणेने लक्ष दिले नव्हते. ही बाब लक्षात आल्याने ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सतीश निकम व सचिव सुरेश मवाळ यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनाही लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली. दरम्यान, आरोग्य विभागाने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे.
ग्रामसेवकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:35 AM