लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना लसीकरणास देशभरात १६ जानेवारीपासून सुरुवात हाेणार आहे. त्यादृष्टीने आराेग्य विभागाने जिल्ह्यात लसीकरण माेहीम राबविण्याची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात १० केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशभरात काेराेना लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू हाेणार असल्याची घाेषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातही आराेग्य यंत्रणेने लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. पहिल्यात टप्प्यात आरोग्य विभागातील १३,५०० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना १० केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणाच्या मोहिमेत कुठलीही अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून लसीकरणाची ८ जानेवारी रोजी रंगीत तालीम करण्यात आली हाेती. लसीकरणासाठी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी त्रिस्तरीय रचना करण्यात येणार आहे. नोंदणीकृत लाभार्थीच्या मोबाइल क्रमांकावर लसीकरण तारीख, वेळ व ठिकाणचा मॅसेज पाठविण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यातील दहा केंद्राची निवड करण्यात आली असून, तेथे तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. आराेग्य विभागाची तयारी पूर्ण झाली असली तरी अद्याप लस काेणती देण्यात येणार, याविषयीची माहिती आराेग्य विभागाला मिळालेली नाही. आतापर्यंत १३ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे नोंदणी झालेली आहे. सोबतच लस साठवणुकीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आराेग्य प्रशासनाला काेराेना लसीची अद्याप प्रतीक्षा आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू हाेण्याची शक्यता आहे.
या केंद्रात हाेईल लसीकरण जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, मलकापूर, बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, साेनाळा, सुलतानपूर आणि नांदुरा येथे आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्याविषयीची तयारी आराेग्य विभागाच्या पूर्ण झाली आहे.
आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. त्यासाठी दहा केंद्रांची निवड करण्यात आली असून, तयारी पूर्ण करण्यात आली आहे. लस कुठली येणार तसेच कधी येणार याविषयी माहिती मिळालेली नाही. - डाॅ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा