लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात व्यापकस्तरावर लसीकरण मोहिम राबवली जाण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयातील शितकरण यंत्रांची तपासणी करण्यात आली असून गेल्या तीन महिन्यापासून त्यादृष्टीने जिल्हा परिषदेतंर्गत अनुषंगीक काम करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.दरम्यान, अद्याप कोरोना लस नेमकी कधी येईल हे स्पष्ट नसले तरी त्यासंदर्भातील प्रारंभीची पायाभूत सुविधा जिल्हास्तरावर तयार करण्यात आली असून राज्यस्तरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रस्तावर अनुषंगीक पाहणी व तपासणी केली गेली आहे. कोरोनाची लस ही अधिक प्रभावी रहावी या दृष्टीकोणातून जिल्हास्तरावरील कोल्ड चेनचा ही आरोग्य विभागाने अभ्यास केला असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरोग्य विभागाची ही कोल्ड चेन २ ते ९ अंश सेल्शीयस तापमान राखण्याच्या दृष्टीने सक्षम आहे. कोरोना संदर्भाने चार प्रकारचे व्हॅक्सीन राहण्याची शक्यता आहे. त्यापैकी नेमके कोणते व्हॅक्सीन मिळणार हे जिल्हास्तरावर अद्याप स्पष्ट नाही. मात्र त्यादृष्टीने आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व अनुषंगीक आराखडा तयार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील सुत्रांनी सांगितले.जिल्हास्तरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आरोग्य विभागाकडे शितकरण यंत्रणा उपलब्ध असून व्हॅक्सीन कॅरियर यंत्रणेचाही यात विचार केला गेला आहे. आरोग्य विभागाकडे उणे २० पासून ते ९ अंश सेल्शीयस तापमान राखण्याची सुविधा उपलब्ध आहे.जिल्हास्तरावरही व्हॅक्सीन साठवणुकीच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध आहे. दरम्यान प्रसंगी वरिष्ठ पातळीवरून नेमक्या काय सुचना येतात लसीकरणासंदर्भातील मार्गदर्शक सुचनांच्या आधारे प्रसंगी यंत्रसामुग्री तथा लस साठवणुकीच्या यंत्रणेत बदल केला जावू शकतो, असेही सुत्रांचे म्हणणे आहे.
आयएलआरची सुविधायुएनडीपी (संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम) मार्फत प्राप्त सुचनांनुसार कोल्ड चेन अधिक सक्षम करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर डब्ल्यूआयसी (वॉक इन कोल्ड रुम)ची सुविधा उपलब्ध आहे. राज्यस्तरावरही ती आहे. तसेच आयएलआर (आईस लाईन्ड रेफरीजरेटर)ही उपलब्ध आहे. तसेच व्हॅक्सीन कॅरियरची सुविधाही प्राथमकि आरोग्य केंद्रस्तरावर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त राज्यस्तरावर व मोठ्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलीजन्सचाही उपयोग व्हॅक्सीनसाठीच्या शितकरण यंत्रणेमध्ये करण्यात येत आहे.
या ठिकाणच्या यंत्रणेची झाली तपासणीजिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय स्तरावर आरोग्य विभागासाठी आवश्यक असलेली शितकरण यंत्रणा उपलब्ध आहे. त्याची सुस्थिती काही सुधारणा करावयाच्या असल्यास त्या करणे अशी कामे गेल्या तीन महिन्यापासून करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सुत्रांनी स्पष्ट केले.