लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुषंगानेच पूर्वतयारी म्हणून ८ जानेवारी रोजीची रंगीत तालीम करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने २ अंश सेल्सिअस ते ८ अंश सेल्सिअस तापमानादरम्यान साठवाव लागणारी लस उपलब्ध होईल, असे संकेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिले. बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून, आतापर्यंत १३ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे नोंदणी झालेली आहे. सोबतच लस साठवणुकीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. शीतकरण साखळीतील सर्व उपकरणांची चाचपणीही झाली असल्याचे ते म्हणाले.दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात एका दिवशी ५,२०० व्यक्तींना लस देता येईल, एवढी क्षमता आरोग्य विभागाची आहे; मात्र कोरोना संसर्ग व धोके पाहता गुणात्मक पद्धतीने आजवरची सर्वात मोठी ही लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे केवळ उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने हे अभियान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रसंगी येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यताही सध्या आरोग्य विभागाच्या वतुर्ळात सुरू आहे; परंतु अधिकृत स्तरावर त्याबाबत कोणी बोलण्यास तयार नाही.
लसीकरणानंतर ३० मिनिटेच निरीक्षण का?लसीकरणानंतर लाभार्थ्याला तेथेच ३० मिनिटे निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. कोरोना लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नसल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले; मात्र अनेकदा मानसिक स्तरावर अस्वस्थता असल्याने काहींना रिॲक्शन येण्याची शक्यता असते. तर काहींना ॲलर्जीची शक्यता असते. या सर्व बाबी साधारणत: ३० मिनिटांमध्ये घडू शकतात. त्यानुषंगाने लसीकरणानंतर ३० मिनिटे डॉक्टरांच्या निरीक्षणात लाभार्थ्यांना ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तेथे लाभार्थ्यांचे समुपदेशनही करण्यात येऊन व्यसनमुक्तीसह अन्य आरोग्यविषयक माहिती देऊन त्यांची जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे या लसीकरणासंदर्भात कोणी शंका बाळगू नये, असेही आरोग्य विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.