लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना बाधितांची संख्या जिल्ह्यात सातत्याने वाढत असून जळगाव जामोद, शेगाव आणि बुलडाणा तालुक्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. संग्रामपूर तालुक्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याने येथील पॉझिटिव्हीटी रेट कमी दिसतो. येथील चाचण्या वाढविल्यास वास्तविकता समोर येण्यास मदत होईल. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या चाचण्या जिल्ह्यात वाढल्या. त्यावेळी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा सरासरी १६ टक्के होता. तो महिनाअखेर १२ टक्क्यांवर आला असला तरी प्रामुख्याने जळगाव जामोदचा २५ टक्के आणि शेगावचा पॉझिटिव्हीटी रेट २३ टक्के तर बुलडाणा तालुक्याचा पॉझिटिव्हीटी रेट २० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. हे तिन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पाॅट ठरत आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता फेब्रुवारी महिन्यात ३८ हजार ६०७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४,६६५ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. झाडेगावात १४ टक्के ग्रामस्थ पॉझिटिव्हजळगाव जामोद तालुक्यातील १४२८ लोकसंख्या असलेल्या झाडेगावातील तब्बल १४ टक्के ग्रामस्थ अर्थात १९७ जण आतार्पंत कोरोना बाधित आढळून आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी येथे झालेल्या तपासणीत एकाच वेळी १५५ जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर २३, एकदा ७ आणि एकदा ५ या प्रमाणे तपासणीत ग्रामस्थ बाधित आढळून आले आहे. एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के नागरिक येथे बाधित आढळून आल्याने हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी यांनीही येथील सविस्तर आढावा मधल्या काळात घेतला होता.
CoronaVirus in Buldhana : तीन तालुक्यांचा पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 12:08 PM