कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सेवेत असलेली सर्व रुग्णालये, ऑक्सिजन पुरवठादार कंपन्या, यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घरी राहून कर्तव्य पार पाडणाऱ्या ग्राहकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणचे अभियंते, तंत्रज्ञ, यंत्रचालक, सर्व कर्मचारी, बाह्य स्त्रोत कामगार, ग्राहक सेवेत आहेत. रुग्णालय, विलगीकरण कक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यावश्यक सेवांना सुरळीत व अखंडित वीज मिळेल, याची खबरदारी घेत कोरोनाच्या काळात महावितरणचे कर्मचारी कार्यरत आहेत.
रात्री-बेरात्री करावी लागतात कामे
२४ तासात कधीही रात्रीबेरात्री फोन आल्यानंतर तात्काळ दुरुस्तीसाठी जावे लागते. सध्या वादळी वाऱ्यामुळे लाईनवर बिघाड होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खासगी लोकांचे सहकार्य घेऊन बिघाड झालेल्या ठिकाणी पोहोचून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम आम्ही करीत आहोत.
अमोल वानखेडे, तंत्रज्ञ
महावितरणच्या कर्मचाऱ्यांची सेवा पाहून त्यांना सुविधा देणे आवश्यक आहे. त्यांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा.
प्रवीण भाकडे, तंत्रज्ञ
आमचे महावितरण कर्मचारी, लाईन स्टाफने कोरोना काळात व वादळातसुद्धा अनेक अडचणीवर मात करीत ग्राहकांना सुरळीत वीज पुरवली. मात्र
संकटाच्या काळात काम करूनही त्यांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा मिळालेला नाही. आमच्या कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा मिळावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
दिलीप निकम
सहायक अभियंता.