लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्याचा मृत्युदर वाढला हाेता. जिल्हाभरातील गंभीर रुग्णांना बुलडाणा शहरातील काेविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येत असल्याने मृत्यूची संख्या वाढली आहे. काेराेनामुळे मृत्यू झालेल्या अनेकांचे मृतदेह नातेवाइक स्वीकारत नाहीत. त्यामुळे अशा मृतदेहांवर बुलडाणा पालिकेकडूनच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पालिकेने यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे.
बुलडाणा शहरातील स्त्री रुग्णालयात काेविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. अद्ययावत सेवा असल्याने जिल्हाभरातील अत्यवस्थ काेराेना रुग्णांवर बुलडाणा शहरात उपचार करण्यात येतात. यातील अनेकांचा मृत्यू हाेताे. अनेक वेळा नातेवाईक मृतांचे अंत्यसंस्कार करण्यास तयार हाेत नाहीत. त्यामुळे, अशा मृतांवर नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पालिकेच्या आराेग्य विभागाकडे ही जबाबदारी साेपवण्यात आली असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
राज्यातील काही नगरपालिका मृतांच्या नातेवाइकांकडून पैसे घेत असल्याचे चित्र आहे. मात्र, बुलडाणा नगरपालिकेने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही मृत्यू झालेल्या काेराेना रुग्णांवर माेफत अंत्यसंस्कार केले आहेत. तसेच अंत्यसंस्कारासाठी कुठलाही विलंब हाेत नसल्याचे चित्र आहे.
अंत्यसंस्कारासाठी पाच हजारांचा खर्च
एका प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेला साधारणपणे पाच हजार रुपये खर्च येताे.
राॅकेल मिळत नसल्याने डिझेल विकत घ्यावे लागत आहे. तसेच लाकडे, गाेवऱ्या आदींचा खर्च हाेत आहे.
अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट व इतर साहित्य पुरवण्यात येते. त्यावरही खर्च हाेताे.
नगरपालिकेने अंत्यसंस्कारावर जवळपास २५ लाख रुपये खर्च हाेणार असल्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
बुलडाणा नगरपालिकेतील आराेग्य कर्मचाऱ्यांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी देण्यात आली आहे.
आराेग्य विभागाने अंत्यसंस्कारासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
दिवसरात्र हे कर्मचारी तैनात असतात.
काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांची विटंबना हाेऊ नये, यासाठी या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
राखेची विल्हेवाटही नगरपालिकेकडूनच
काेराेनामुळे मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे नातेवाईक अंत्यसंस्काराला हजर राहत नसल्याचे चित्र आहे. तसेच प्रेत जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी राख सावटायलाही कुणी येत नाही. त्यामुळे, स्मशानभूमींमध्ये राखेचे ढीग साचतात. नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमाेडे यांनी स्वत: पुढाकार घेऊन ही राख जमा करण्यासाठी पुढाकार घेतला हाेता. त्यानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने नियमितपणे राखेची विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यावरही नगरपालिकेचा खर्च हाेत आहे. गत वर्षभरापासून नगरपालिकेकडून हा उपक्रम सुरू आहे.
बुलडाणा नगरपालिकेच्या वतीने काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांवर माेफत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. नगरपालिकेला वर्षभरात जवळपास २५ लाख रुपयांचा खर्च येण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. या प्रस्तावाला अजून मंजुरी मिळालेली नाही.
महेश वाघमाेडे, मुख्याधिकारी न.प.