लोणार : तालुक्यातील चोरपांग्रा काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरले असून, रविवारी आणखी २५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. गत आठ दिवसांत गावात ८२ रुग्ण आढळले असून, आठ जणांनी काेराेनावर मात केली आहे, तसेच ७४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ग्रामस्थ चाचणीला प्रतिसाद देत नसल्याने अनेक रुग्ण फिरत असल्याची भीती आहे. त्यामुळे आराेग्य विभागाची डाेकेदुखी वाढली आहे.
गत काही दिवसांपासून लाेणार तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात चाेरपांग्रा गाव काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरले असून गावात काेराेनाचा कहर सुरूच आहे. रविवारी आणखी २५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. सातत्याने आरोग्य विभाग कोरोना चाचण्या करीत आहे; परंतु नागरिक प्रतिसाद देत नाही. त्यातही ज्या अल्प चाचण्या होत आहेत त्यातसुध्दा मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी येथील नागरिकांच्या रोषाला बळी पडत आहेत. जाणीवपूर्वक आमच्या गावातील नागरिक कोरोना पाॅझिटिव्ह दाखवले जात आहेत, असा गावकऱ्यांचा समज झाल्याने ते आरोग्य कर्मचाऱ्यांवर संतप्त होत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत भर पडत आहे. सध्या या गावातील ८ रुग्ण लोणार कोविड सेंटरवर उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाले आहेत, तर ७४ रुग्णांवर लोणार कोविड केंद्रात उपचार सुरू आहेत. अधिकांश रुग्णांना लक्षणे नसल्याने ते लोणार येथे उपचारासाठी जाण्यासाठी उत्सुक दिसत नाही. प्रशासनाने संपूर्ण गावालाच क्वाॅरंटाइन करून येथील रुग्णांना गावातच विलगीकरणात ठेवल्यास परिस्थिती आटाेक्यात येणार आहे.