- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पाण्याचा गुलाबी रंग झाल्यामुळे देशभरात चर्चेचा विषय बनलेल्या लोणार सरोवराच्या विकास व संवर्धनालाही कोरोनाचा फटका बसला असून येथील जैवविविधता वृद्दींगत व्हावी, त्यात अडथळा येवू नये म्हणून सरोवरात वाढलेली वेडी बाभूळ काढण्याच्या कामासाठी आवश्यक असलेला सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहे.कोरोना संसर्गामुळे आरोग्यासह अत्यावश्यक बाबींवरच खर्च करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. वित्त विभागानेही यासंदर्भात एक आदेश मध्यंतरी निर्गमित केला होता. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात उपलब्ध निधी पैकी ३३ टक्केच निधी कामांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचा फटका लोणार सरोवर विकास व संवर्धनाला बसला आहे.लोणार सरोवरातील जैवविविधतेला सरोवरात मध्यंतरी मानवी हस्तक्षेपामुळे वाढलेल्या वेड्या बाभळीमुळे धोका निर्माण झाला होता. या वेड्या बाभळीमुळे सरोवर परिसरात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या स्थानिक वृक्षांच्या प्रजातींना अटकाव होण्याची भीती पाहता ही वेडी बाभूळ काढण्याबाबत नागपूर खंडपीठानेच आदेश दिला होता. त्यातंर्गत मधल्या काळात हे काम येथे सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निधी उपलब्धतेची अडचण पाहता या कामालाही फटका बसला आहे.सरोवरात ३३.३९ हेक्टरवर वेडी बाभूळ पसरलेली आहे. त्यापैकी आतापर्यंत ६.६७ हेक्टरवरील वेडी बाभूळ सातपुडा संस्थेच्या सहकार्यातून स्थानिक पर्यावरणाला धोका न पोहोचवता तथा रासायनिक द्रव्यांचा वापर न करता काढण्यात आली होती. मात्र त्यानंतरही २६.७२ हेक्टरवरील वेडी बाभूळ काढण्याचे काम बाकी आहे. त्यासाठी जवळपास दोन कोटी रुपयांच्या निधीची अवश्यकता असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे प्रारंभी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार ३३.३९ हेक्टरवर ही वेडी बाभूळ असल्याचे समोर आले होते. नंतर करण्यात आलेल्या पाहणीत जवळपास ५३ हेक्टरवर ही वेडी बाभूळ असल्याचे समोर आले होते.यासाठी नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डाचीही मान्यता घेण्यात आली होती. जानेवारी २०१९ मध्ये ही मान्यता मिळाली होती. त्यानंतर प्रत्यक्षात कामास प्रारंभ झाला होता. सातपुडा संस्थेच्या माध्यमातून येथील जवळपास ६.६७ हेक्टरवरील वेडी बाभूळ काढण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अत्यावश्यक बाबींवरच खर्च करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे वन्य जीव विभागाचा जवळपास दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव रखडलेला आहे. सरोवर विकास व संवर्धनाच्या दृष्टीने चालू आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थंसंकल्पात विशेष तरतूदही करण्यात आली होती. त्यामुळे सरोवर विकास व संवर्धनाच्या कामांना वेगळी मान्यता घेण्याची गरज राहली नव्हती. गरजेनुसार येथे निधी उपलब्ध केल्या जावू शकत होता. मात्र कोरोना संसर्गाचाही फटका याला बसला आहे.
लोणार सरोवर पर्यटकांसाठी खुलेमिशन अनलॉक मोहिमेदरम्यान वन्यजीव विभागाने लोणार सरोवर परिसरही पर्यटनासाठी खुला केला आहे. . मात्र लोणार सरोवरात खाली मंदिरे असल्याने आत सरोवरात उतरण्यास वन्यजीव विभागाने मनाई केलेली आहे. केवळ किन्ही रोडच्या बाजूने पर्यटकांना सरोवर पाहण्याची मुभा दिली असल्याची माहिती वन्यजीव विभागीय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली. त्यामुळे सरोवरातील गुलाबी पाणी बघण्याचा पर्यटक आनंद घेवू शकतात.
दहा वर्षाखालील मुले व वृद्धांना बंदी
लोणार सरोवर पाहण्यासाठी पर्यटकांना खुले करण्यात आले असले तरी दहा वर्षाखालील मुले आणि ६५ वर्षावरील वृद्धांना यात बंदी घालण्यात आली आहे. तसेच वाहन निर्जंतुकीकरणाची सुविधा लोणारात नसल्याने वाहन येथे वापरण्यास मनाई केली गेली आहे. पर्यटकांनी मास्क वापरणे तथा सॅनिटायझरचा वापर करणे येथेही अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.