लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या संशयित रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल येण्यास तब्बल सात दिवसांचा कालावधी लागत असल्याने या सेंटरमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांसह नातेवाइकांचा जीव टांगणीला लागत आहे.कोरोना विषाणू महामारीच्या उपचारासाठी सुरुवातीचे दिवस महत्त्वाचे समजले जातात. त्याचवेळी तालुक्यातील काही संशयित रुग्णांच्या स्वॅब नमुन्याचे अहवाल सात दिवसांनंतरही प्राप्त होत नसल्याने त्यांच्यावर उपचारालाही विलंब होण्याचा प्रकार घडत आहे. नांदुरा शहरासह तालुक्यातील संशयित कोरोना रुग्णांचे स्वॅब आयटीआय येथील कोविड केअर सेंटरमध्ये घेतले जातात. त्यानंतर ते अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. त्यापूर्वी तीन ते चार दिवसांत अहवाल प्राप्त होत असत; मात्र आता या चाचणीचा अहवाल मिळण्यास सात दिवसांचा कालावधी लागत आहे.काही नंतर पाठवलेल्या स्वॅबचे अहवाल चौथ्या व पाचव्या दिवशी आले. तर काही सातवा दिवस असूनही प्रलंबित आहेत. या सर्व विलंबाने संशयित कोरोना रुग्ण व नातेवाइकांचा जीव टांगणीला लागत आहे. २३ सप्टेंबर रोजी शहरातील काही रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासोबत संपर्क केला असून, काही अहवाल प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली. काही रुग्णांना लक्षणे दिसल्यास तत्काळ रॅपिड टेस्ट करून औषध उपचार केल्या जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांनी दिली. बुलडाणा येथे आरटीपीसीआर लॅब कार्यान्वित झाली असली तरी अद्याप तपासणी अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.
पाठवलेल्या स्वॅब नमुन्यांचे रिपोर्ट तीन ते चार दिवसांनी मिळतात. प्रलंबित रिपोर्टबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासोबत संपर्क केला आहे.-अभिलाश खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी नांदुरा