लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अकोला जिल्ह्यातून खामगाव येथील नातेवाईकाकडे दोन दिवस वास्तव्यास असलेला एक युवक बुधवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे खामगाव शहरातील गोपाळ नगरात एकच खळबळ उडाली असून, प्रशासनाने बुधवारी उशिरारात्री या युवकाच्या संपर्कात आलेल्या २२ जणांना क्वारंटीन केले आहे.मुंबई येथून आलेली एक महिला काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली होती. त्यामुळे खामगाव शहरातील जिया कॉलनी सील करण्यात आली होती. या कॉलनीतील प्रतिबंधात्मक उपाययोजना थांबत नाही, तोच खामगाव शहरातील गोपाळ नगरात वास्तव्यास असलेला एक युवक कोरोना पॉझिटीव्ह निघाला. या युवकाचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होताच, खामगाव नगर पालिका प्रशासनाच्यावतीने स्थानिक गोपाळ नगरातील विविध वस्ती सील करण्यात आल्या आहेत. वस्तीतील गल्ली-बोळीत बॅरेकेटींग करण्यात आले. तसेच परिसरात सर्वत्र निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी करण्यात आली.गोपाळ नगराचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. याठिकाणी निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी करण्यात आली असून, ३०४ कुटुंबांच्या तपासणीस सुरूवात करण्यात आली आहे- धनंजय बोरीकरमुख्याधिकारी, खामगाव