बुलडाणा: नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या आणि जवळपास ५९ दिवस जिल्ह्यात अस्तित्व असलेल्या ‘त्या’ ११ जणांचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या ११ जणांच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालय, एलसीबी कार्यालय आणि बुलडाणा शहर पोलिस ठाण्यातील तब्बल ३९ पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना क्वारंटीन व्हावे लागले असून त्यांचे स्वॅब नमुनेही २८ एप्रिल रोजी रात्री अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.कामठी येथील इस्माईलपुरा भागातून आलेल्या ११ जण जवळपास ५९ दिवस बुलडाणा जिल्ह्यात होते. त्यांची यापूर्वी आरोग्य तपासणीही झाली होती. त्यात त्यांना कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात गावी परत जाण्यासाठी अर्ज केला होता. परिस्थितीचे गांभिर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी तथा स्वॅब नमुन्यांचे तपासणी अहवाल आल्यानंतर मेडीकल प्रोटोकॉलमध्ये ते बसत असल्यासच त्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर तपासणी झाल्यांतर तिघांचे नमुने पॉझीटीव्ह आले होते. पोलिस दलासह जिल्हातील प्रशासन हादरून गेले. परवानगीच्या चौकशीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्वागत कक्षातील कर्मचारी, एलसीबी आणि बुलडाणा शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी या व्यक्तींच्या संपर्कात आले होते. अशा संपर्कात आलेल्या ३९ जणांची यादीच पोलिस अधीक्षकांनी आरोग्य विभागास प्रदान केली. त्यांची आता मेडीकल प्रोटोकॉलनुसार तपासणी होऊन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
शेगावमध्ये केले क्वारंटीनसर्वच्या सर्व ३९ पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांना शेगाव येथील डेडीकेटेड कोवीड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. तेथे सायंकाळ दरम्यान, या सर्व पोलिस कर्मचारी अधिकाºयांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. रात्री उशिरा त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.