लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सध्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियोजनात गुंतलेली असताना बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५.८९ अर्थात सहा टक्क्यांवर आल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग सध्या जिल्ह्यात आटोक्यात येत असल्याचे एक सुखद चित्र आहे. मात्र त्याउपरही सतर्कही काळाची गरज बनली आहे.बुलडाणा जिल्ह्यात सध्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ११,५७० वर पोहोचली असून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मृत्युदर सध्या १.१९ असून, तो आटोक्यात आला असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात ९४ हजार २३५ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आरटीपीसीआरच्या ६१ हजार ८७१, ट्रुनेटच्या ५,३१४ आणि रॅपिड टेस्ट २७ हजार ५० करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संदिग्धांच्या चाचण्यांची संख्या आता एक लाखाच्या टप्प्यात आली असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली होती. त्यातच ६ हजार शिक्षकांच्या तीन ते चार दिवसात चाचण्या पूर्ण करण्याचे उद्दिष्टही आरोग्य विभागाने पूर्ण केले होते. त्यावरून आरोग्य सचिवांनी बुलडाणा जिल्ह्यात प्रतिदिन २,८०० कोरोना चाचण्या करणेचे दिलेले निर्धातरि उद्दिष्ट आरोग्य विभाग येत्या काळात पूर्ण करेल अशी आशा निर्माण झाली आहे.सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५.८९ टक्के असून रुग्ण दुपटीचा वेगही आता मंदावला असून तो ८२ दिवसावर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात हा वेग ७८.६ दिवस होता. हा वेगही आता मंदावला आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची व्याप्ती तुलनेने जिल्ह्यात घटत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या १.१९ टक्के आहे. काेराेनामुळे बाधितांचा मृत्यू हाेण्याचे प्रमाणही गेल्या आठ ते दहा दिवसात कमी झाले आहे. दरम्यान सुपर स्प्रेडरच्या चाचण्या करण्यासही जिल्हा प्रशासनाने वेग दिला आहे. प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावरून बसगाड्यांवरील चालक, वाहक यांचेसह भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक यांच्या काेराेना चाचण्या करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणा व संस्थांशी आराेग्य विभागाकडून पत्रव्यवहार झाला असून सुपरस्प्रेडरच्या चाचण्यांचाही वेग वाढला आहे.
CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ६ टक्क्यांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 11:18 AM
Coronavirus in Buldhana : सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५.८९ टक्के असून रुग्ण दुपटीचा वेगही आता मंदावला आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात ९४ हजार २३५ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या.संक्रमणाची व्याप्ती तुलनेने जिल्ह्यात घटत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.