लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली असून मलकापूर तालुक्यात सहा तर संग्रामपूर तालुक्यात आठ रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नऊ जून रोजी मलाकपूर तालुक्यातील धोंगर्डी येथील मृत पावलेल्या व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील मृत व्यक्तींची संख्या चार झाली आहे.मलकापूर तालुक्यात ११ जून रोजी सहा कोरोना बाधीत आढळून आले. त्यापैकी शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच आहे. भिमनगरमधील दोन पुरूष, एक महिला व अन्य भागातील दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे एकट्या मलकापूर तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या २९ वरून ३५ वर गेली आहे. धोंगर्डी येथील ७० वर्षीय व्यक्तीला बुलडाणा आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. त्याचा ९ जून रोजी रात्रीच आयसीयुमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना अहवाल ११ जून रोजी पॉझिटीव्ह आला आहे. धोंगर्डी येथील या मृताच संपर्कातील व्यक्तींना आता क्वारंटीन करण्यात येत आहे.धक्यादायक बाब म्हणजे पातुर्डा येथील आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आठ व्यक्तीही पॉझिटव्ह आढळून आल्या आहेत. त्यातील सात व्यक्ती या पातुर्डा गावातीलच असून एक जण संग्रामपूर येथील आहे. आरोग्य विभागाचे पथक पातुर्डा व संग्रामपूर येथे दाखल झाले आहे.गुरूवारी बुलडाणा येथील कोवीड केअर सेंटरमधून साखरखेर्डा येथील चार जणांना सुटी देण्यात आली. वैद्यकीय संकेतानुसार ही सुटी देण्यात आली. दरम्यान खामगाव येथील कोवीड रुग्णालयातूनही दोन रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांनाही सुटी देण्यात आली आहे. खामगावमधील समता कॉलनी आणि पुरवार गल्लीमधील महिलेचा यात समावेश आहे. ११ जून रोजी एकूण सहा जणांना सुटी झाली आहे. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ७२ वर पोहोचली आहे तर मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. सध्या ३४ कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर आता सुरू झाला असून गुरूवारी एकाच दिवशी १४ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या आहेत. यातील एका व्यक्तीचा आधी मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागाने आता मलकापूर आणि संग्रामपूर तालुका अधिक गांभिर्याने घेण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी मलकापूरची गंभीर स्थिती पाहता ११ जून रोजी तेथे भेट देवून पाहणी केली.
कोरोना मुक्त झालेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना सुटीसाखरखेर्डा: येथील वार्ड क्रमांक पाच मधील एकाच कुटूंबातील चार व्यक्ती कोरोना मुक्त झाले असून गुरूवारी त्यांना सुटी देण्यात आली. या कुटुंबातील एक व्यक्ती आधीच कोरोनामुक्त झाला होता. येथील ४५ वर्षीय व्यक्ती कामानिमित्त औरंगाबाद येथे गेला होता. तेथील कंपनी बंद पडल्याने तो गावाकडे आला होता. तेथे तो एका बाधीताच्या संपर्कात आला होता. त्यातच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलाचे काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत डोणगाव येथे लग्न झाले होते. दरम्यानच्या काळात कोरोना बाधीताची लक्षणे त्याच्यात आढळून आली होती. त्यामुळे बुलडाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचीही तपासणी केली असता आई, भाऊ, मुलगी, मुलगा कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्यावर बुलडाणा येथे उपचार करण्यात आले. दरम्यान आता पाचही जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांची बुलडाणा रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे. त्यामुळे साखरखेर्डा गावाही आता कोरोनामुक्त झाल्यात जमा असून नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र शारीरिक आंतर राखण्यासोबतच नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे.