लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील हायरिस्क झोनमध्ये आरोग्य विभागाच्या पथकाकडून सुरू करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत १४ हजार ५८० नागरिकांपैकी ५६ जणांमध्ये सर्दी, तापाची लक्षणे दिसून आली आहेत.दरम्यान, बुलडाणा शहरातील हायरिस्क झोनमध्ये जवळपास १२ नगरे येत असून या नगरांमध्ये २४ हजार ८१५ एवढी लोकसंख्या आहे. ३१ मार्च पासून आरोग्य विभागाच्यावतीने महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाचे सहकार्य घेऊन आरोग्य तपासणी मोहिम व माहिती संकलन सुरू आहे. या दरम्यान, चार हजार घरातील १४ हजार ५८० नागरिकांची एक एप्रिल पर्यंत तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ८९ पथकांना ५६ व्यक्तींना सर्दी, ताप असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आरोग्य पथकातील डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहे.बुलडाणा शहरात २८ मार्च रोजी कोरोना संसर्गाने एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्याच्या निकटच्या संपर्कातील ६६ पैकी ३२ व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी मृतकाच्या अत्यंत निकट असलेल्या चार जणांना हा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले होते. यामध्ये एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा समावेश आहे. दुसरीकडे या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या आरोग्य प्रशासनाने मिर्झानगर, इकबाल चौकासह, टिळकवाडी, जुनागावमधील काही भाग सील करून या हायरिस्क झोनमध्ये तपासणी मोहिम सुरू केली. दरम्यान एक एप्रिल रोजी टिळकवाडी आणि जुनागाव परिसरातील काही भाग सील केला होता. या भागात जिल्हा परिषदेच्या दोन व्यक्तींच्या पथकांद्वारे घरोघरी जावून माहिती संकलीत करण्यात येत आहे.समुह संक्रमणाचा धोका; स्थिती मात्र नियंत्रणात बुलडाणा येथे कोरोना संसर्ग झालेले पाच व्यक्ती आढळून आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या चार आहे. यापैकी तीन जण हे मृत व्यक्तीचे निकटवर्तीय आहेत तर एक खासगी रुग्णालयातील कर्मचारी आहे. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातून ६८ व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले असून त्यापैकी ३२ जणांचे स्वॅब नमुने आले आहेत. एका धार्मिक कार्यक्रमास दिल्लीत गेलेले १५ जणांचे व काल पाठवलेले ३ स्वॅबचे अहवाल मिळाले नाहीत. ५६ जणांना सर्दी, ताप असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत समोर आले असले तरी त्यांच्यामध्ये कुठलीही कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यांच्यावर योग्य पद्धतीने मॉनिटरींग करण्यात येत असून शहरातील परिस्थिती तुर्तास नियंत्रणात आहे. आरोग्य विभागाच्या ८९ पथकातील प्रत्येक व्यक्तीकडे ५० व्यक्तींच्या मॉनिटरिंगची जबाबदारी देण्यात आलेली आहे