लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात जेथे ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता तेथे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर ऑक्सीजनवरील रुग्णांची संख्या घटली असून जिल्ह्यातील पाच कोवीड रुग्णालयात उपलब्ध असलेल्या २२० ऑक्सीजन बेड पैकी ९२ बेड अर्थात ४२ टक्के बेड रिकामे असल्याचे प्रशासकीय आकेवारीवरून स्पष्ट होते आहे.जिल्ह्यात बुलडाणा येथे डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल असून येथे १०० ऑक्सीजनच्या खाटा आहे. यापैकी ४६ खाटा रिकामय आहेत. मलकापूरमधील २५ पैकी १९ खाटा, देऊळगाव राजातील २५ पैकी खाटा रिकाम्या आहेत. खामगावमध्ये ५० पैकी ११ खाटा रिकाम्या आहेत. त्यावरून ऑक्सीजनची मागणी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत घटल्याचे चित्र आहे. दुसरीकडे लिक्वीड ऑक्सीजन टँक ऐवजी ऑक्सीजन जनरेशन प्लॅन्ट बुलडाणा कोवीड रुग्णालयात उभारण्याचा निर्णय झाला असून त्याचे डिझाईनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बनविण्यात आले आहे. हे कामही लवकरच मार्गी लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे बुलडाणा स्त्री रुग्णालयात भविष्यात कायमस्वरुपी ऑक्सीजन जनरेशन प्लॅट उभा राहून आॅक्सीजनची कायमस्वरुपी समस्या दुर होण्यास मदत होणार आहे.दुसरीकडे कोवीड केअर सेंटर सह कोवीड हेल्थ सेंटरमध्येही रुग्ण संख्या घटत असून नऊ ऑक्टोबर रोजी ६० टक्के खाटा रिकाम्या झाल्याचे चित्र दिसून आले. प्रामुख्याने अलिकडील काळात लक्षणे नसलेल्या बाधीतांना तथा गंभीर स्वरुपाचा त्रास नसलेल्यांना होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मधल्या काळात जिल्ह्यातील जवळपास १०७ जणांनी हा पर्याय निवडला होता. त्यात आता वाढ होत असल्याचे चित्र आहे.परिणामी कोवीड रुग्णालयावरील ताणही काही प्रमाणात कमी झाल्याचे एकंदरीत चित्र तुर्तास तरी दिसत आहे.