लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गृह विलगीकरणामधील (होम क्वारंटीन) नागरिकांमध्ये रविवारी २५ ने वाढ झाली आहे. सद्यस्थितीत गृह विलगीकरणात १३३ नागरिक आहेत. आज एक रिपोर्ट प्रयोगशाळेतून प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह आला आहे.तसेच रविवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी १५ नमुने पाठविण्यात आल्याची माहिती प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १७ वर पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ११ एप्रिल पर्यंत १०८ नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटीन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातील काही नागरिकांची आज मुक्तता करण्यात आलेली नाही. नवीन नागरिकांची गृह विलगीकरणात २५ ने वाढ झाल्यामुळे ‘होम क्वारंटीन’च्या संख्येत वाढ झालेली आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगिकरणात ८० व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणात तीन नागरिकांची भर पडली आहे. यामधून २५ नागरिकांची मुक्तता करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)