लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे ११ बाधीत रुग्ण आढळून आल्याने सहा तालुक्यातील दहा हजार घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी तथा तब्बल १४ दिवस या घरामधील नागरिकांच्या आरोग्याच्या स्थितीची माहिती संकलीत करण्यात येत आहे. यापैकी एकट्या बुलडाणा शहरातील लोकसंख्या ही २४ हजारांच्या घरात आहे. जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेडचा धोका पाहता आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर असल्याचे चित्र आहे.बुलडाणा जिल्ह्यात १२ मार्च पासून आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आा आहे. त्यानंतर कलम १४४ आणि नंतर थेट संचारबंदी लागू करण्यात आली होती. प्रारंभी बुलडाणा शहरात कोरोनो पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील अन्य चार जण पॉझीटीव्ह आढळले होते. त्यानंतर दिल्ली येथील एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील काही नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, सहा मार्च रोजी मध्यरात्री दरम्यान जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींचा आकडा हा ११ व पोहोचला होता. यापैकी एका व्यक्तीचा ११ मार्च रोजी मृत्यू झाला होता. दरम्यान, सातत्याने वाढता हा आकडा पाहता बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये क्लस्टर कंटेन्मेंट प्लॅन लागू करण्यात आला आहे. बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, खामगाव, शेगाव या तालुक्यांचा यात समावेश आहे. या तालुक्यातील ज्या शहरामध्ये हे पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत त्या शहराच्या सीमा लॉकडाऊन करण्यात आल्या आहेत. बुलडाण्या पाठोपाठ, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, शेगाव शहरासह खामगाव तालुक्यातील चितोडा गावाच्या सीमा लॉक करण्यात येऊन तिहेरी सुरक्षा या ठिकाणी लावण्यात आली आहे.