लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील हायरिस्क अर्थात दुषीत क्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या भागातील नागरिकांच्या आरोग्याचीही नियुक्त करण्यात आलेल्या पथकाद्वारे काळजी घेण्यात येत असून त्यांना प्रसंगानुरूप वैद्यकीय मार्गदर्शन व मदत ही करण्यात येत आहे.नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील प्रत्येक व्यक्ती हा परिसरातील किमान ५० व्यक्तींच्या संपर्कात राहणार असून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात दररोज माहिती घेणार आहे. त्या माहितीचे संकलन होणार आहे. सोबतच संबंधीत व्यक्तीस जर काही आरोग्यविषयक तक्रार असले तर त्यादृष्टीने डॉक्टरांकडून संबंधिताला मार्गदर्शन करून उपचारही करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले. त्यामुळे हायरिस्क झोनमधील कामाचेही योग्य पद्धतीने नियोजन झाले आहे. त्यामुळे कुठलाही गोंधळ उडणार नाही. तथा दररोज अद्ययावत माहिती आरोग्य विभागास मिळून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी अशा उपाययोजना करणे शक्य होणार असल्याचे सुत्राचे म्हणणे आहे.