बुलढाणा : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने बुलडाण्यात शिरकाव केल्यानंतर झपाट्याने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूने एकाचा बळी घेतल्यानंतर आता आणखी इतरांनाही त्याची लागण होत असून, गुरुवारी आणखी एकाचा चाचणी अहवाल ‘कोरोना’ पॉझिटीव्ह आल्याने बाधितांची संख्या पाच झाली आहे. पैकी एकाचा मृत्यू झाला असून, चार जणांवर उपचार सुरु आहेत. २८ माार्च रोजी मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या अत्यंत निकट संपर्कातील ही व्यक्ती आहेबुलढाणा शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या गेल्या तीन दिवसापासून सातत्याने वाढत आहे. २९मार्च रोजी पाठविण्यात आलेल्या ३१ स्वब नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या तीन नमुन्यांचे अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालय रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे . तर अन्य दोन रुग्णांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत .त्यामुळे २८इ मार्च रोजी मृत्यू झालेल्या व्यक्तीसह आजपर्यंत एकूण पाच रुग्ण बुलढाणा येथे पॉझिटिव आढळून आले आहेत. सध्या आयसोलेशन कक्षात २१ जणांवर उपचार करण्यात येत आहे. बुधवारी एकच नमुना पॉझिटिव आला होता. हा व्यक्ती ज्या भागात राहतो तो टिळकवाडी जुनागाव परिसरातील काही भाग सील करण्यात आलेला आहे, तसेच जिल्हा परिषदेच्या पथकाद्वारे या भागात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. बुलढाणा शहरातील हाय रिस्क झोनमधील मधील १६००० नागरिकांपैकी १३ हजार नागरिकांची आतापर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान अवघा १४ चौरस किमी विस्तार असलेल्या बुलढाणा शहरात ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे गांभीर्य वाढले आहे. सोबतच कम्युनिटी स्प्रेड चा धोका अधिक वाढला आहे. परिणामी नागरिकांनीही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील हाय रिस्क झोनमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच पालिकेकडून सलग दोन दिवस सोडियम हायपोक्लोराईड सोबत फिनाईल ची फवारणी निजंर्तुकीकरणासाठी केली जात आहे .मात्र आरोग्य विभागाने काढलेल्या पत्रकात फिनाईलची कुठेही नोंद नाही.