बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी २० एप्रिल रोजी पाठविण्यात आलेल्या दहा स्वॅब नमुन्यांपैकी सहा नमुने निगेटीव्ह आले आहेत.सध्या आयसोलेशनमध्ये कोरोना संसर्ग झालेले १२ रुग्ण उपचार घेत असून त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींचे व कोरोना बाधीत व्यक्तींचे पुन्हा तपासणीसाठी घेतलेले चार स्वॅब नमुने असे एकूण दहा नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा नमुने निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, अन्य चार नमुन्यांचा अहवाल अपेक्षेप्रमाणे आलेला नाही. त्यामुळे कोरोना ससंर्ग झालेल्या परंतू प्रकृती स्थिर व सुधारणा होत असलेल्या काही रुग्णांच्या घरवापसीस विलंब होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बुलडाणा जिल्हयातून ३३९ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी ३३४ नमुने आतापर्यंत प्राप्त झाले असून त्यापैकी ३०९ नमुने निगेटीव्ह आलेले आहेत. ही जिल्ह्यासाठी मोठी दिलासा देणारी बाब म्हणावी लागले.
दरम्यान, सध्या रुग्णालयात उपाचर घेत असलेल्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांचेही स्वॅब नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यांच्यात होत असलेल्या सुधारणेचा अंदाज घेऊन ते पाठविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात चाचणी केलेल्या स्पॅम्पलची संख्या आणि संदिग्ध रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात तफावत येत आहे.