लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या सात दिवसात १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनाग्रस्त रुग्णांचा संयम आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात खांद्याला खांदा देवून लढत असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेचा हा परिपाक आहे.दुसऱ्या लॉकडाउन दरम्यानच बुलडाणा जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. १३ पैकी सात तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह, महसूल, जिल्हा परिषद आणि पोलिस प्रशासनावर ताण वाढला होता. त्यामुळे दहा कंटेन्मेंट झोनमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले. संक्रमीत व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तितक्याच तत्परतेने करण्यात आले. २१ संक्रमीत व्यक्तींच्या संपर्कातील २४२ व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. सर्वात जिकरीचे असणारे हे काम महसूल यंत्रणा व जिल्हा परिषदेचे इन्सीडंट कमांडर तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्या पथकाने आरोग्य विभागाच्या सहकार्यातून तितकेच गंभीरतने करत जिल्ह्यात निर्माण झालेला कम्युनिटी स्प्रेडचा धोका टाळण्यात जिल्ह्याला मोठे यश मिळाले आहे.दरम्यान, आता शेगाव, खामगाव तालुक्यातील चितोडा आणि देऊळगाव राजा हे तीन कंटेन्मेंट झोन कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी चिखली येथील एक, देऊळगाव राजा येथील एक आणि मलकापूर येथील एक असे तीन रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यांना आगामी १४ दिवस होम क्वारंटीन रहावे लागणार आहे. यापूर्वी २३ मार्च रोजी शेगाव येथील दोन तर खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक असे तिघे तर १७ एप्रिल रोजी बुलडाणा, चिखली, चितोडा आणि शेगाव येथील एकूण पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सहा रुग्णांचीही प्रकृती स्थिरसध्या बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा येथील प्रत्येकी एक आणि मलकापूर येथील तीन रुग्णांवर बुलडाणा येथील कोवीड-१९ रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांनाही लवकरच सुटी दिली जाईल, असे सुत्रांनी सांगितले. शनिवारी बरे झालेल्या रुग्णांना सुटी देते वेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व सीएस डॉ. पंडीत उपस्थित होते.
CoronaVirus in Buldhana : आणखी तीन रुग्णांची कोरोना संसर्गावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:27 AM