बुलढाणा : शहरातील एकाचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या घेण्यात आलेल्या स्वॉब नमुण्यांपैकी तीघांचे अहवाल शुक्रवारी पहाटे प्राप्त झाले असून, या तींघांनाही कोरोना विषाणूची बाधा झालेली नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. अद्याप १६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. बुलडाण्यात आतापर्यंत पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.बुलढाणा जिल्ह्यातून आतापर्यंत ६९ जणांचे स्वाब नमुने पाठविण्यात आले होते. पैकी आतापर्यंत ५३ नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अद्याप सोळा नमुन्यांचे अहवाल बाकी आहेत. वर्तमान स्थितीत बुलढाणा शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच आहे. यातील एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मृत व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्तींचा समावेश आहे. गुरुवारी दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या १७ पैकी१५ जणांचे स्वाब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ११० संधीग्ध ची तपासणी करण्यात आली असून, १११ जण सध्या विलगीकरण कक्षामध्ये आहेत. दुसरीकडे बुलढाणा शहरातील हाय रिस्क झोनमधील २३ हजार ८१५ नागरिकांपैकी १४ हजार ५०० नागरिकांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये चार हजार घरांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये सर्दी आणि तापाचे लक्षण असलेल्या ५६ जणांवर आरोग्य विभागाने औषधोपचार सुरू केला आहे.