बुलडाणा: कोरोना संसर्गाचा विळखा आता बुलडाणा जिल्ह्यास पडत असून आणखी दोन जणांचे स्वॅब नमुने पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये बुलडाण्यातील एक व शेगावातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. परिणामी जिल्ह्यात आता समूह संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेगावातील एक रुग्ण पॉझीटीव्ह आला आहे तर बुलडाण्यातीलही एक जण पॉझीटीव्ह आहे. त्यामुळे बुलडाण्यातील पॉझीटीव्ह व्यक्तींची संख्या सहावर गेली असून यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला आहे. दुसरा रुग्ण हा शेगावातील असून शेगावातही आता कोरोना संसर्गाने शिरकारव केला आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा, खामगाव आणि शेगाव हे पाच तालुके आता कोरोनासंसर्गग्रस्त झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून आतापर्यंत ११४ जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८६ स्वॉबचे नमुने प्राप्त झाले आहेत. त्यातील ११ जणांचे पॉझीटीव्ह अहवाल आले आहेत. अद्याप २८ जणांचे स्वॅबचे नमुने येणे बाकी आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील ५३३ संदिग्ध रुग्णांची आतापर्यंत तपासणी करण्यात आलेली आहे. पैकी ३६३ जण क्वारंटीनमध्ये आहेत.
शेगाव तालुक्यातही क्लस्टर प्लॅन अॅक्टीव?
शेगाव तालुक्यातही एक रुग्ण पॉझीटीव्ह आल्यामुळे तालुक्यातही आता क्लस्टर प्लॅन अॅक्टीव करावा लागणार आहे. त्यानुषंगाने प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सतर्क झाली आहे. रात्रीतूनच अनुषंगीक हालचाली होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या घराला केंद्रबिंदू मानून त्याच्या घराच्या तीन किमी परिघात आता तिहेरी स्वरुपात लॉक डाऊन होणार असून यातील पहिल्या टप्प्यातील हायरिस्क झोनमधील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करण्यात येईल.