-नानासाहेब कांडलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: जळगाव जामोद शहरात राहणारा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्याच दरम्यान या दोन कुटुंबातील नऊ जणांना रात्रीच कोविड रुग्णालयात कॉरंटीन करण्यासाठी खामगाव येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान नगरातील ज्या भागात संबंधित रुग्णाचे घर आहे,तो दोन किमी चा परिसर सील करण्यात आला असून नगरातील व्यापारपेठ ही सोमवारी बंद ठेवण्यात आली आहे. नगरातील दोन व्यक्ती बऱ्हाणपूर येथे गुरुवार 7 मे रोजी आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधी करता मोटारसायकलने गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांना त्या अंत्यविधीत काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती मिळाली. म्हणून त्या दोघांनी त्यांना कोणतेही सिम्प्टम्स नसताना जळगावच्या आरोग्य विभागाकडे सदर माहिती दिली आणि आम्ही काय करायला पाहिजे अशी विचारणा केली असता आरोग्य विभागाने त्यांना खामगाव येथे सामान्य रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी असे सांगितले.त्याप्रमाणे ते दोघे स्वतः खामगाव येथे रुग्णालयात गेले दोघांचे स्वब घेण्यात आले. त्यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
या पृष्ठभूमीवर रविवारी रात्री दोन वाजेपर्यंत उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात एस डी ओ वैशाली देवकर , तहसीलदार डॉ.शिवाजी मगर व मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे यांचेसह आ. डॉ. संजय कुटे यांनी या पृष्ठभूमीवर नियोजन केले. आणि त्या दोघांच्या कुटुंबातील नऊ जणांना रात्री खामगाव येथे पाठविण्यात आले. तसेच हा भाग सील करण्यात आला आहे. रविवार सायंकाळी बुलढाणा जिल्हा कोरोना मुक्त झाल्याच्या पृष्ठभूमीवर जळगाव येथे एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
" जळगाव शहरातील दोघेजण बऱ्हाणपूर येथे अंत्यविधी ला गेले होते. त्यांनी स्वतःच ही माहिती आरोग्य विभागाला दिली. त्यामुळे त्यांना खामगाव येथे पाठवून स्वब घेण्यात आले. त्यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने पुढील कार्यवाही सुरु आहे."
- डॉ.उज्वला पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी जळगाव जामोद
"नगरात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने नगरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश होते. त्याप्रमाणे नगरातील व्यापारपेठ प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे."
- अजय वानखेडे, अध्यक्ष व्यापारी संघटना जळगाव जामोद
"एक रुग्ण जळगाव नगरात कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नियमाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. त्याच्या कुटुंबीयांना रुग्णालयात कॉरंटीन करण्यात आले आहे. सदर रुग्ण कोणाच्या संपर्कात आला ही माहिती घेणे सुरू आहे. नगरातील काही भाग सील करण्यात आला आहे."
- वैशाली देवकर , उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद