Coronavirus : शेगावात गजानन महाराज दर्शन सुविधा बंद, मंदिर परिसरात जमावबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 9:25 PM
शेगाव येथे २ एप्रिलरोजी होणारा रामनवमी उत्सवही स्थगित
बुलडाणा/ शेगाव: कोरोना रुग्णांची वाढती संख्या व वाढता संसर्ग लक्षात घेता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरातील ‘श्रीं’ची दर्शन सुविधा ३१ मार्चपर्यत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. याशिवाय २ एप्रिलरोजी आयोजित श्री रामनवमी उत्सव सुद्धा स्थगित करण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे. जन्मोत्सवा दरम्यान, शेगाव येथील संत श्री. गजानन महाराज मंदिर परिसरापासूनच्या ५० मीटर क्षेत्रात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आल आहे. एक एप्रिल ते तीन एप्रिल २०२० च्या रात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करत कायदा व सुव्यवस्था अबाधीर राखण्याच्या दृ्ष्टीकोणातून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलमांचा आधार घेत एक एप्रिल रोजी सकाळी सहा ते तीन एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्र्यंत हे कलम १४४ लागू केले आहे. जिल्हाधिकाºयांनी शेगाव येथील दर्शन सुविधाही बंद करण्याचे या आधीच निर्देशीत केलेले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोणातून ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यानुषंगाने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार सामुदायीक कार्यक्रमास प्रतिबंध करण्याबाबतच्या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७चा आधार घेत हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.शेगाव येथे २५ मार्च पासून रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून खबरदारीचा व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा जन्मोत्सव रद्द करण्यात आला आहे. शेगाव संस्थांच्या वतीनेही त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्याउपरही भाविकांची ‘माऊली’वर असलेली श्रद्धा पाहता येथे भाविक गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे हे पाऊल उचलले आहे.