खामगाव: कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी पोलिस, आरोग्य आणि पालिका कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील ग्रीन झोन मध्ये असलेल्या शहरांमधील ‘लॉकडाउन’मध्ये शिथिलता देण्याची शक्यता आहे, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे व्यक्त केला.
मंगळवारी खामगाव येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा धावता दौरा झाला. यावेळी ना. देशमुख यांनी ३ मे नंतर ग्रीन झोन मधील शहरांना दिलासा दिल्या जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली. त्याचवेळी जिल्ह्यातील रेड झोन मध्ये असलेल्या शहरांमधील लॉकडाउनमध्ये वाढ होणार असल्याची शक्यताही वर्तविली.
कोरोना विरोधातील लढाईत राज्यातील पोलिस कर्मचारी, अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि कर्मचा-यांसोबतच सफाई कामगारांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. कोरोना विरोधात राज्यातील प्रत्येक शहरात चांगल्या पध्दतीने काम सुरू असल्याबाबत गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
आजी आणि माजी आमदारांमध्ये जुंपली!
गृहमंत्री अनिल देशमुख यांना शहरातील अवैध दारू विक्री संदर्भात आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी निवेदन सादर केले. दारू विक्रेत्यांवर कारवाईचीही मागणी त्यांनी लावून धरली. त्यावेळी उपस्थित असलेल्या माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी अवैध दारू विक्री संदर्भात कारवाईची आपण सुरूवातीलाच मागणी केली असल्याची स्पष्टोक्ती दिली. गृहमंत्र्यांचा ताफा रवाना झाल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये प्रतिक्रीया देताना माजी आणि आजी आमदारांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक रंगली.