बुलडाणा: गेल्या १४ दिवसापासून बुलडाणा शहरात एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळलेला नसून २८ मार्च रोजी मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पॉझीटीव्ह आलेल्या चौघांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी १३ एप्रिल रोजी सायंकाळी पाठविण्यात येत आहेत. दरम्यान, या चौघांचेही नमुने हे निगेटीव्ह येण्याची आशा बुलडाणेकर व्यक्त करत आहेत.बुलडाणा शहरात २८ मार्च रोजी मृत पावलेल्या व्यक्तीचे स्वॅब नमुने हे २९ मार्च रोजी पॉझीटीव्ह आले होते. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पश्चिम वºहाडात कोरोना संसर्ग झालेला मृत व्यक्ती हा पहिला ठरला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले होते. सोबतच बुलडाणा शहरातील २४ हजार हायरिस्क झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली होती. तसेच मृत व्यक्तीच्या थेट संपर्कातील अर्थात हायरिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्या व्यक्तींना क्वारंटीन करण्यासोबतच त्यांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान, यामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातीलच चार जणांचा तर पाचवा व्यक्ती हा वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा होता. सध्या या व्यक्तींना आयसोलेशन कक्षात १४ दिवस पूर्ण झाले असून त्यांच्यापैकी चौघांची आता पुन्हा नव्याने कोरोना संसर्गाची तपासणी करण्यात येत आहे. त्यांचे स्वॅब नमुने घेण्याचे आदेश सकाळीच देण्यात आले होते. त्यानुसार हे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. प्रसंगी त्याचा अहवाल १४ एप्रिल रोजी येण्याची शक्यता आहे.सध्या या पाचही रुग्णांची प्रकृती स्थिर असून यातील चौघांचे स्वॅब नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले. बुलडाणा शहराच्या दृष्टीने ही मोठी दिलासादाक बाब असून या पाचही व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे. त्यांचे दुसºयांदा पाठविण्यात आलेले स्वॅब नमुन्यांचे अहवाल जर निगेटीव्ह आले तर संबंधितांना कोरोना संसर्गासंदर्भातील मेडीकल प्रोटोकॉल तपासून आयसोलेशन कक्षातून सुट्टीही दिली जावू शकते, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सांगितले.
CoronaVirus : बुलडाण्यातील चौघांचे स्वॅब नमुने पुन्हा पाठवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 4:19 PM