लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील सात प्रतिबंधीत क्षेत्र हे आॅरेंज झोनमध्ये परावर्तीत झाले असले तरी अद्यापही जिल्ह्यात १४ प्रतिबंधीत क्षेत्र कायम असून त्यातील ३० हजार नागरिकांचे १०० पेक्षा अधिक पथकांद्वारे आरोग्य सर्व्हेक्षण सध्या करण्यात येत आहे.बुलडाणा जिल्ह्यात स्वगृही परतण्याची परवानगी अनेकांना दिल्या गेली आहे. त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसात जिल्ह्यात आढळून आलेले कोरोना बाधीत व्यक्ती या मोठ्या शहरातून आल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात चार प्रतिबंधीत क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने मलकापूर पांग्रा, आव्हा सारख्या गावांचा समावेश आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ३५ असून त्यापैकी २४ जण बरे झाले आहेत तर आठ जणांवर सध्या उपचार करण्यात येत आहे. तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रारंभी जिल्ह् यात ११ प्रतिबंधीत क्षेत्र होते. या ११ प्रतिबंधीत क्षेत्रातील सुमारे एक लाख नागरिकांचे आरोग्य विषयक सातत्यपूर्ण सर्व्हेक्षण करण्यात येत होते. दरम्यान पाच मे रोजी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार ११ प्रतिबंधीत क्षेत्राची व्याप्ती घटविण्यात आली होती. त्यानंतर १५ मे रोजी केंद्र सरकारने पुन्हा एक पत्र पाठवून २८ दिवसांपेक्षा अधिक कालावधीत ज्या प्रतिबंधीत क्षेत्रात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला नाही, असे प्रतिबंधीत क्षेत्र आॅरेंज झोनमध्ये परावर्तीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २० मे रोजी जिल्ह्यातील सात प्रतिबंधीत क्षेत्र आॅरेंज झोनमध्ये परावर्तीत करण्यात आले होते.मात्र नंतर बुलडाणा जिल्ह्यात आव्हा, अलमपूर, जळका भडंग, शेगाव आणि उमरा, दोन भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रात पुन्हा वाढ होऊन आता ही संख्या १४ वर पोहोचली आहे. या १४ प्रतिबंधीत क्षेत्रातील सुमारे ३० हजार नागरिकांचे आता आगामी १४ दिवस नियमितपणे आरोग्य विषयक सर्व्हेक्षण करण्यात येत असून त्यासाटी १०० पेक्षा अधिक पथके नियुक्त करण्यात आली आहे.प्रामुख्याने यामध्ये प्रतिबंधीत क्षेत्रातील सदी, ताप, खोकल्याचे रुग्ण शोधून त्यांची तपासणी केल्या जात आहे. सोबतच दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचाही सर्व्हे या भागात केला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल विभागाची प्रामुख्याने मदत घेण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास ४ टक्के नागरिकांचे अशा पद्धतीने सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.येत्या काळात प्रसंगी कोरोना संसर्गाचे जिल्ह्यात संक्रमण वाढल्यास याची व्याप्तीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील सुमारे एक हजार नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले असून त्यापैकी ८०० पेक्षा अधिक नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले असून ३५ जणांचे अहवाल केवळ पॉझिटिव्ह आढूळून आलेले आहेत.कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोहिम सुरूगेल्या दोन दिवसात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्या आणि आलेल्यांचा आरोग्य, जिल्हा प्रशासन, जि. प. प्रशासन, पोलिस दलाच्या समन्वयातून शोध घेण्यात येत आहे. सोबतच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेली ही पाचही ठिकाणे उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधीत क्षेत्रे म्हणून घोषित केली आहेत.