- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने खबरदारी उपाययोजना म्हणून खामगाव तालुक्यात दाखल झालेल्या सर्वच साडेपाच हजाराच्यावर नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली. बाहेरगाव तसेच महानगरातून आलेल्या प्रत्येक नागरिकाची तात्काळ तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य प्रशासनाने २७ मार्च रोजी दिले होते. तपासणीनंतर या नागरिकांना २१ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जिल्ह्यातील रहिवासी असलेले मात्र, रोजगारासाठी महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, अहमदनगर यासारख्या महानगरात तर गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि सूरत येथील सुमारे २५ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी जिल्ह्यात प्रवास केला. खामगाव तालुक्यातील ९७ गावांमध्ये तब्बल साडेपाच हजारापेक्षा जास्त नागरिक बाहेरगावहून दाखल झालेत. यापैकी शनिवारपर्यंत अनेकांची तपासणी अपूर्ण होती. त्यानंतर दक्षता पथकाकडून वेळीच दखल घेत, बाहेरगावहून आलेल्या प्रत्येक नागरिकाची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये प्रवास करणारे लक्ष्य!
लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी अनेकांनी आपल्या दुचाकी आणि खासगी वाहनांचा वापर केला. बाहेरगावहून आलेल्यांची पंचायत समिती प्रशासनाकडून माहिती संकलित आली. सोबतच पंचायत समितीकडून आरोग्य विभागाकडे तपासणीसाठी त्यांचा अद्ययावत डाटा देण्यात आला. त्यानंतर खामगाव तालुक्यातील सर्वच सुमारे साडेपाच हजार नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली. बाहेरगावहून आलेल्या प्रत्येकाला प्राथमिक आरोग्य ेकेंद्रात पाठविण्यात आले. यासाठी गावातील पोलिस पाटील, सरपंच, आरोग्य सेविका यांची मदत घेण्यात आली.
खामगाव तालुक्यात सर्वाधिक संख्या!
बाहेरगाव आणि महानगरातून खामगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच साडेपाच हजार नागरिक बाहेरगावहून आलेत. त्यानंतर मोताळा तालुक्यात सुमारे साडेतीन हजार, मेहकर तालुक्यात तीन हजार, तर सर्वात कमी बुलडाणा तालुक्यात ८२२ नागरिकांनी स्थलांतर केले आहे. खामगाव तालुक्यात बाहेरगावहून तसेच महानगरातून येणाºया प्रत्येक नागरिकावर दक्षता पथकाचा वॉच आहे.
बाहेरगावचा व्यक्ती रात्री कोणत्याही वेळेत आल्यास त्याची प्राथमिक आरोग्य केंद्रातून तपासणी करण्यात आली. त्यांना २१ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. या नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर तहसील प्रशासन लक्ष ठेवून आहे.
- डॉ.शीतलकुमार रसाळ तहसीलदार, खामगाव.