बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता पाच शहरांमध्ये सोमवार, २२ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजतापासून ते १ मार्चपर्यंत लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. बुलडाणा, चिखली, देउळगावराजा, खामगाव आणि मलकापूर हे पाच नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित घाेषित करण्यात आले आहेत.
अमरावती विभागीय आयुक्तांनी प्रतिबंधात्मक क्षेत्र व इतर क्षेत्रासाठी लाॅकडाऊनच्या निर्देशांची सोमवारी घाेषणा केली. त्यानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, खामगाव आणि मलकापूर प्रतिबंधात्मक शहरे घाेषित केली आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ही सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू राहतील.
लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला २४ हजारांची दारू पकडली!
खामगाव शहरातील बाजारपेठेत पेट्रोलिंग करीत असलेल्या गुन्हे शाखा पथकाने २४ हजारांची दारू पकडली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून जिल्ह्यातील खामगावसह पाच तालुक्यात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने खामगाव शहर पोलीस स्थानकाचे स्थानिक गुन्हे शोध पथक शहरातील बाजारपेठेत गस्त घालीत होते.
अशा आहेत उपाययोजना
- प्रतिबंधात्मक क्षेत्रातील किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकाने वगळता सर्व प्रकारची गैरआवश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील.
- नगरपालिका क्षेत्रांतील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आली, ते सुरू राहतील.
- सर्व शासकीय कार्यालये आणि बँकांमध्ये १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती उपस्थिती ग्राह्य धरली जाईल.
- ग्राहकांनी जवळची बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडूनच खरेदी करावी.
- उपहारगृहे, हॉटेल प्रत्यक्ष सुरू न ठेवता पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील.
नागपूर : जिल्ह्यात ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने संपूर्ण ‘लॉकडाऊन’ सध्या तरी टाळला असून, त्याऐवजी गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार निर्बंध अधिक कडक करताना ७ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालये, आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, शनिवार व रविवारी सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत.
सोमवारी सकाळी पालकमंत्री नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ‘कोरोना’ स्थिती व आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. नवीन ‘हॉटस्पॉट झोन’मधील इमारती, गल्ली, वस्तीनिहाय ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ तयार करून तेथे सक्तीने उपाययोजना राबविण्यात येतील.
विदर्भात बाधितांची संख्या तीन लाखांवर
कोरोना संसर्गाच्या ११ महिन्यात सोमवारी विदर्भात बाधितांची संख्या तीन लाखावर गेली आहे. आजचा २३०८ नव्या बाधितांमुळे रुग्णांची एकूण संख्या ३००१२५ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १४३१३३ तर मृत्यूची संख्या ४२८३ झाली. अमरावती जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ३०१९७ तर मृत्यूची संख्या ४६५ झाली.