मलकापूर :- रात्रीला सोसाट्याचा वारा सूटून विज पुरवठा खंडित झाला. परिणामतः संपूर्ण शहरासह उपजिल्हा रुग्णालयातील बत्ती गुल झाली. लाईट गेल्याने उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर मधील भरती रुग्ण व नातेवाईकांची एकच धांदल उडाली. दरम्यान व्हेंटिलेटरवर असलेल्या एका ५४ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली या बाबीची आज १ मे रोजी सकाळी शहानिशा केली असता वेगळेच सत्य समोर आले. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मौजे भाडगणी येथील उपचारार्थ भरती असलेला कोरोना बाधित रुग्ण मंगलसिंह राजपूत यांचा मृत्यू वीज खंडित होण्याच्या नऊ ते दहा मिनिटे आधीच झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेमकी सत्यता काय? याबाबत अद्यापही गोंधळाची परिस्थिती कायम आहे हे विशेष.
वातावरणात अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला परिणामतः तांत्रिक बिघाडामुळे रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी वीज वितरण कंपनीचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे संपूर्ण शहराची लाईट गुल झाली. वीज पुरवठा खंडित झाल्याने उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर मधील रुग्णांमध्ये धांदल उडाली. गर्मी मुळे अंगात लाहीलाही झाल्याने काहींनी बाहेर येऊन मोकळ्या हवेत राहण्यावर भर दिला. दरम्यान मौजे भाडगणी येथील कोरोना बाधित रुग्ण मंगलसिंह राजपूत यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली हा मृत्यू वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे व्हेंटिलेटर बंद पडल्याने झाल्याचा आरोपही येथे करण्यात आला. या घटनेसंदर्भात शहानिशा केली असता सदर रुग्णाचा मृत्यू हा वीज पुरवठा खंडित होण्याच्या दहा मिनिट आधी म्हणजेच ९ वाजून २० मिनिटांनी झाला होता अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कोविड केअर सेंटर मध्ये एकूण २५ बेड उपलब्ध असून मृतक मंगलसिंग राजपूत यांच्यावर गत काही दिवसापासून येथे उपचार सुरू होता.
उपचारादरम्यान या रुग्णाला रेमडेसिविरचे सहा इंजेक्शनचे डोस पूर्णतः देण्यात आले होते. तरीही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे या रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. तर कोविड केअर सेंटर मधील व्हेंटिलेटरला सहा तासांचा यूपीएस बॅकअप असून विद्युत पुरवठा खंडित झाल्यावरही त्याचा तब्बल सहा तास व्हेंटिलेटरवर कसलाही परिणाम होत नाही. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू अन् वीज पुरवठा खंडित होणे याचा कसलाही अर्थाअर्थी संबंध येत नाही असा खुलासाही प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नाफडे यांनी बोलताना केला.