लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : कर्नाटक राज्यातून बुलडाणा जिल्ह्यात परतलेल्या तीन संदिग्ध रुग्णांना क्वारंटीन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.या तिघांमध्येही सर्दी, तापाची लक्षणे आढळून आली असून सतर्कता म्हणून त्यांना क्वारंटीन करण्यात येऊन बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. नऊ एप्रिल रोजी सायंकाळी ते बुलडाणा येथे पोहोचतील. प्रामुख्याने महामार्ग, राज्य मार्गावरील अपघात प्रवण स्थळालगत रस्त्याच्याकडेला लावण्यात येणारे लोखंडी संरक्षक कठडे लावण्याचे काम हे तिघे जण करत होते. कर्नाटक राज्यातील विजापूर येथून ते आठ मे रोजी ते पायी चालत बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले होते. मेहकर तालुक्यातील डोणगाव नजीक या तिनही मजुराचे गाव असून कर्नाटक राज्यात ते कामावर होते. आठ मे रोजी रात्री ते जिल्ह्यात दाखल झाले होते. रात्री गावालगतच्याच एका शेतात त्यांनी मुक्काम केला. सोबतच सतर्कता म्हणून हे तिघे डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी पोहोचले. तेथे त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर बिबे यांनी त्यांची तपासणी केली. दरम्यान, सर्दी, तापासारखी तत्सम लक्षणे प्रवासाचा इतिहास असलेल्या व्यक्तींमध्ये आढळल्यास संबंधितांना बुलडाणा येथे क्वारंटीन कक्षात पाठवावे अशा सुचना वरिष्ठ पातळीवर दिलेल्या आहेत. त्यामुळे डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई यांनी या तिघांनाही बुलडाणा येथे पाठविले आहे. त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. डोणगाव येथून दुपारी दीड वाजेच्या सुमारास या तिघांनाही डोणगाव येथून बुलडाण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.
Coronavirus : कर्नाटकमधून आलेले तिघे क्वारंटीन; स्वॅब नमुने तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:26 AM