लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम जिल्ह्याच्या तुलनेत बुडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८३ टक्के अर्थात ९६ टक्क्यांवर स्थिर झाले आहे. अकोला, वाशीम जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बुलडाणा जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. बुलडाणा जिल्ह्यात सध्या १२,१३६ कोरोनाबाधित असून, त्यापैकी ११,६३७ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्युदर हा १.२० टक्के आहे. एका महिन्यांपासून हा मृत्युदर सध्या स्थिर असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३५३ आहे. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यातील जवळपास एक लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. वर्तमान स्थितीतही सूक्ष्मस्तरावर कोरोना चाचण्यांचे नियोजन करण्यात आले असून, त्याचा फायदा रुग्णसंख्या कमी होण्यास होत आहे. दररोज सरासरी ३८५ संदिग्धांचे अहवाल प्राप्त होत असून, त्यातही आरटीपीसीआर चाचण्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रविवारीही ३२२ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. ट्रुनॅटच्या १५, रॅपिड टेस्ट ४८ अशा एकूण ३८५ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. अद्याप १ हजार १७७ जणांच्या चाचण्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
अकोल्यानंतर बुलडाण्यात सक्रिय रुग्णअकोला जिल्ह्यात बुलडाणा जिल्ह्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. बुलडणा जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३५३ आहे, तर अकोला जिल्ह्यात ती ७६२च्या आसपास आहे. वाशीम जिल्ह्यात बुलडाण्याच्या तुलनेत अवघे २३२ कोरोना बाधित रुग्ण असल्याचे प्रशासकीय आकडेवारी सांगते.