जळगाव जामोद: नगरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपकार्तील सर्व २२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जळगाव नगरासह तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी रात्री बाधित रुग्णाच्या कुटुंबातील दोघे जण व फळांच्या व्यवसायात मदत करणारे दोन व्यक्ती अशा चार जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यांना कोविंड रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते जळगावला आपापल्या घरी पोहोचले आहे. यापूर्वी बाधित रुग्णाचे काका यांचा रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह होता. त्यामुळे आता बाधित रुग्ण सोडून त्यांच्या कुटुंबातील दहा जण, मित्र परिवारातील नऊ जण व व्यवसायात सहकार्य करणारे दोन ड्रायव्हर व दोन कामगार अशा सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जळगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील कंटेनमेंट झोन मात्र कायमच राहणार आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने या झोनमधील ४४६ कुटुंबांची तपासणी सुद्धा नियमाप्रमाणे केली जात आहे व नगरपरिषदेच्या वतीने या झोनची सॅनीटायझेशनची प्रक्रियासुद्धा नियमितपणे सुरू आहे. परप्रांतातून आलेल्या व्यक्तीनी आपली नोंद करीत तपासणी करून घ्यावी असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर यांनी केली आहे. कंटेनमेंट झोनमधील बँकांना आपले कामकाज सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले सर्व २२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी या सर्वांना होम कॉंरंटीन करण्यात आले असून कुटुंबात सुद्धा त्यांनी विलगीकरनाच्या नियमाचे पालन करावे, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीच्या मित्राला ताप, खोकला, सर्दी आदी त्रास नसल्याचे कोविड रुग्णालयातून घरी परतलेल्या व्यक्तींनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
( तालुका प्रतिनिधी)