बुलडाणा: जिल्ह्यात स्वगृही परतणाºया नागरिकांची संख्या लाखाच्या जवळ येऊन ठेपलेली असतानाच कोरोना संसर्गाचा धोका जिल्ह्यात वाढला असून गेल्या १८ तासात जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात वाढले आहे. गत सहा दिवसाचा आढावा घेतला तर सहा दिवसात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली आहे.१६ मे रोजी सायंकाळी शेगाव पालिकेचा सफाई कामगार आणि खामगाव शहरात जिया कॉलनीमध्ये मुंबईवरून आलेली एक महिला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर १७ मे रोजी सकाळीच मुंबईतून मलकापूर तालुक्यात नरवेल येथे परतलेल्या कुटुंबातील एक सात वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बुलडाणेकरांची पहाटच मुळी नव्या धक्क्याने झाली. मुंबईत मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबातील सहा जण मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे गेल्या काही दिवसापूर्वी परतले होते. त्या कुटुंबातील ही मुलगी आहे.दुसरीकडे जळगाव जामोद येथील मृत्य पावलेल्या ७२ वर्षीय व्यक्तीच्या स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असून त्याचा नेमका अहवाल काय येतो याकडे सध्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे बुलडाण्यातील एका व्यक्तीचा २८ मार्च रोजी मृत्यू झालेला असून पाच संदिग्ध रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. पैकी चार जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. आता फक्त जळगाव जामोद येथील मृत व्यक्तीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता २९ वर पोहोचली आहे. पैकी पाच रुग्णांवर सध्या बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत.सध्या कोरोना बाधीतांमध्ये बुलडाणा येथे मलकापूर पांग्रा येथील किडणीच्या आजाराने ग्रस्त असलेली आठ वर्षीय मुलगी, खामगाव येथे जळगाव जामोद येथील फळविक्रेता, खामगावातीलच जिया कॉलनीमध्ये मुंबईतून आलेली ६० वर्षीय महिला, नरवेल येथील सात वर्षाची मुलगी आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षामध्ये शेगाव पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेला ३५ वर्षीय कर्मचारी असे पाच जण उपचार घेत आहेत.
नागरिकांना धास्तीसहा दिवसात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे व जिल्हयात सातत्याने पश्चिम महाराष्ट्र तथा मुंबईतून नागरिक स्वगृही परत आहे. त्यांची वाढती संख्या पाहता आता शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी धास्ती घेतली असून कोरोना संसर्गाचा धोक्याची जिल्ह्यात सध्या व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून स्व जिल्ह्यात येणाºया नागरिकांची संबंधीत जिल्ह्यात कितपत बारकाईने तपासणी होते, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जिल्हा प्रशासनानेही याबाबत संदिग्ध भूमिका न घेता जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा औरंगाबाद, अकोला, जळगाव जिल्ह्याच्याच दिशेने बुलडाण्याची वाटचाल अटळ आहे.