लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: कोविड साथरोग रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, १४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत निर्बंध शिथील केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांनी जिल्ह्यात अनेक बाबी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आठवडी बाजारासह ऑनलाईन शिक्षण, टेली कॉन्सीलींग व शाळेतील इतर कामकाजासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळून ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास मुभा ही देण्यात आली आहे.सोबतच गुरांचे बाजारासह आठवडी बाजार प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत कोरोना संसर्ग सुरक्षा नियमावली अर्थात एसओपी स्थानिक स्वराज्य संस्थेने शासनाच्या कोविड संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे पालन करून तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. प्रतिबंधीत क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील मार्केट्स, दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहण्यास मुभा देण्यात आली आहे. बगीचे, पार्क व सार्वजनिक मोकळ्या जागेतील ठिकाणे मनोरंजनासाठी सुरू ठेवता येणार आहेत. सर्व खासगी व शासकीय ग्रंथालये शारीरिक अंतर राखण्यासोबतच सॅनीटायझींग करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचे पालन करणे अशा ठिकाणी आवश्यक राहणार आहे. उच्च शैक्षणिक संस्था ऑनलाईन व दुरस्थ शिक्षण प्रक्रिया शारीरिक अंतर राखून शिकविण्यास प्रोत्साहीत करता येणार नाही. पीएचडी व विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरीता प्रयोगशाळेचा उपयोग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोबतच कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवण्याची मुभाही देण्यात आली असली तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील, असेही या संदर्भातील आदेशात जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच नियमांचे पालन न करणाऱ्यांनवर दंडात्मक कारवाई ही करण्यात येणार आहे.
CoronaVirus Unlock : बुलडाणा जिल्ह्यात आठवडी बाजार सुरू करण्यास मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:25 PM