- जयदेव वानखडेलोकमत न्युज नेटवर्क जळगाव जामोद : जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात १२ मेरोजी रात्री १० वाजता संदिग्ध कोरोना रुग्ण असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथील रहिवासी आहे. तिच्यावर १३ मे चे पहाटे साडेतीन वाजता पिंपळगाव काळे येथे प्रशासनाच्या सहकार्याने अंत्यसंस्कार करण्यात आले. आधीच एक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या जळगाव जामोद वासीयांसाठी ही बातमी धक्कादायक ठरणार आहे.कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ज्याप्रमाणे त्याचा अंत्यविधी केला जातो. त्याच पद्धतीने सर्व सुरक्षा पाळून तसेच पीपीई कीट धारण करून तिच्या जवळच्या नातेवाईकांसह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्या महिलेच्या मृतदेहाला दहन करण्यात आले . हा अंत्यविधी पिंपळगाव काळे येथे उरकण्यात आला. याबाबत प्राप्त माहिती अशी की, सदर महिला ही तिच्या कुटुंबासह मुक्ताईनगर येथे पोट भरण्यासाठी कामानिमित्त राहत होती .गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी ती आजारी असल्याने तेथील शासकीय रुग्णालयात तिला भरती करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असतानाच १२ मे च्या रात्री १० वाजता तिची प्राणज्योत मालवली. ती कोरोना संशयित असल्याची डॉक्टरांनी शक्यता वर्तविली .यामुळे मुक्ताईनगर येथेच सदर महिलेचे स्वाब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे तिचे रिपोर्ट आल्यानंतरच खरे काय ते कळणार आहे. त्यानुषंगाने तिच्या कुटुंबातील पाच जण व इतर जवळचे नातेवाईक असे एकूण आठ जणांना पिंपळगाव काळे येथे क्वारंटीन करण्यात आलेले आहे.
प्रशासनाची तारांबळ १२ मे च्या रात्री १० वाजता कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मुक्ताईनगर प्रशासनाकडून जळगाव जामोद प्रशासनाला मिळाली. रात्रीच्या वेळी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर ,तहसीलदार शिवाजीराव मगर, नायब तहसीलदार वैभव खाडे, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे ,ठाणेदार सुनील जाधव इत्यादी प्रमुख अधिकाºयांनी तात्काळ सूत्र हलवून रुग्णवाहिकेने महिलेचे पार्थिव रात्रीच पिंपळगाव काळे येथे आणण्यात आले. ती कोरोना संशयित असल्याने शासकीय कार्यवाही नंतर 13 मे च्या पहाटे साडेतीन वाजताचे दरम्यान काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वैद्यकीय नियमानुसार त्या महिलेला दहन करण्यात आले .या सर्व धावपळीत अधिका?्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात जळगाव जामोद येथे एक कोरोना बाधित रुग्ण असल्याने आधीच सर्व अधिकारी अलर्ट झालेले आहेत. त्यात या नवीन प्रकरणाची एन्ट्री झाल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.
मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाल्याबाबत रात्री माहिती मिळाली. ती महिला पिंपळगाव काळे येथील मूळ रहिवासी असून तिचे नातेवाईकांचे इच्छेनुसार अंत्यविधी पिंपळगाव काळे येथे करायचा होता. त्यानुषंगाने शासकीय कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सदर महिलेचा मृतदेहास पिंपळगाव काळे येथे दहन देण्यात आले.- वैभव खाडे , नायब तहसीलदार, जळगाव जामोद