लोकमत न्यूज नेटवर्कपातुर्डा : अपेक्षेपेक्षा कमी भावाने व्यापा-याने कापूस मागितल्याने टाकळी पंच येथील अल्पभूधारक शेतक-याने तो कापूस चक्क नदीपात्रात टाकून देऊन शासनाविषयी रोष व्यक्त केला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने कपाशी उत्पादक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. कपाशीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतमाल फेकून देण्याची पाळी शेतक-यांवर येऊ लागली आहे. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षात शेतक-यांच्या विदारक स्थितीचे चित्रण या घटनेमुळे समोर आले आहे. पातुर्डा येथून जवळच टाकळी पंच येथील अल्पभूधारक शेतकरी लाला महादेव वानखडे या युवा शेतकºयाकडे दोन एकर शेती टाकळी शिवारात आहे. यावर्षी २ क्विंटल २० किलो कापसाचे पीक निघाले. त्याने आपल्या शेतातील कापूस पातुर्ड्यात विक्रीस आणला, तर व्यापाºयाने त्याचा ३० किलो कापूस अवघ्या दहा रुपये किलो भावात मागितला. सध्या ४,३०० रुपयांच्या आसपास कापसाचे भाव आहेत; मात्र शेवटच्या फरदळ कापूस असल्यास सरसकट तीन ते साडेतीन हजार रुपये भाव आहेत. अशा स्थितीत १० रुपये मातीमोल भावाने कापूस मागितल्याने लाला वानखडे यांनी तो कापूस जनावरांना चाºयासाठी टाकून दिला. कापूस एकाधिकार योजना मोडकळीस निघाल्याने कापूस उत्पादक खासगी व्यापाºयांच्या दावणीला बांधला गेला. काही कापूस शेतकºयाने नदीपात्रात टाकून देऊन रोष व्यक्त केला आहे.
कपाशीला भाव देण्याची मागणी कपाशीला योग्य भाव मिळत नसल्याने कापूस पीक शेतकºयांना परवडत नसल्याचे दिसून येते. कपाशीची अत्यल्प भावात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे कपाशीला लागलेला खर्चही भरून निघणे अवघड झाले आहे. कपाशीला शासनाने भाव वाढून द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.
महागडे बियाणे वापरून प्रचंड मेहनतीने पिकवलेला कापूस १० रुपये भावाने मागितला. कृषिप्रधान देशात अशी शेतमालाची मातीमोल खरेदी हा चिंतेचा विषय आहे. शासनाने कापूस उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे.- लाला वानखडे, शेतकरी, टाकळी पंच.