खामगाव (बुलढाणा) : शहरातील वाडी परिसरात असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आढळून आल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
वाडी परिसरातील सन्मती मुलांच्या वसतिगृहातील मुलाकडे देशी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी वसतिगृहातील खोली क्रमांक २०५ मध्ये चौकशी केली. त्यावेळी खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील नितीन राजू भगत (२२) हा तेथे राहत होता. तपासणी केली असता लोखंडी पलंगाखाली एक काळ्या रंगाच्या बॅगमध्ये शैक्षणिक कागदपत्रे, इतर साहित्यासह पिस्टलच्या आकाराचा एक देशी कट्टा, तसेच एका लहान पिशवीत पाच नग जिवंत काडतूस आढळून आले. त्याची किंमत दहा हजार रुपये आहे. त्याला विचारणा केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
पिस्टल अवैध व विनापरवाना असल्याने जप्त करण्यात आले. आरोपी नितीन भगत याच्यावर भादंविच्या कलम ३, २५ शस्त्र अधिनियमान्वये खामगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला, तसेच त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात सपोनि गौतम इंगळे, मोहन करुटले, अमरदीप ठाकूर, गणेश कोल्हे, अंकुश गुरुदेव, विष्णू चव्हाण यांनी केली.