खामगाव : शेतात पऱ्हाटीचे सरण रचून एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना शुक्रवारी उजेडात आली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.जयपूर लांडे येथील श्रीकृष्ण लांडे (७५) व त्यांची पत्नी सईबाई लांडे (७०) हे दोघे गुरुवारी सकाळी गावाजवळच असलेल्या त्यांच्या शेतात नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी गेले होते; परंतु दोघेही उशिरापर्यंत घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा भानुदास लांडे आणि पुतण्या हे दोघे रात्री त्यांना पाहण्यासाठी शेतात गेले. शेतात ते दोघेही कोठेही आढळून आले नाही; मात्र त्याठिकाणी दोघांचेही मृतदेह पºहाटीच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत दिसून आले.हा प्रकार पाहून दोघेही भयभीत झाले. यावेळी भानुदास लांडे यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्याचबरोबर शहर पोलिसांनाही घटनेबाबत त्वरित माहिती देण्यात आली. घटनेचे गांभिर्य पाहता शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील अंबुलकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दोन्ही वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. यावेळी घटनास्थळीच दोन्ही पार्थिवांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली.याप्रकरणी मृत दाम्पत्याचा मुलगा भानुदास लांडे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या दाम्पत्याचा घरात कोणताही वाद नसताना त्यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याचे गुढ मात्र कायम आहे.दुसरीकडे या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याच्या घटनेला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी दुजोरा दिला आहे.१२ जून रोजी सकाळी गाव परिसरात हा संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत. गंजी पेटवून स्वत:च बसले गंजीवर!शेतात लांडे दाम्पत्याने पेटविलेली पºहाटीची गंजी त्यांनी स्वत:च रचली होती. या गंजीला कडब्याच्या साहाय्याने एका बाजूने पेटविले. तर दुसºया बाजूने त्या गंजीवर जाऊन बसले. यावेळी दोघांनीही कोणताही आरडा-ओरडा केला नाही. त्यामुळे हा प्रकार कुणाच्याही निदर्शनास आला नाही.दरम्यान, या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या का केली? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या वृद्ध शेतकरी दाम्पत्याने कुठल्या अन्य कारणावरून तर आत्महत्या केली नसावी, अशीही चर्चा आहे; मात्र कुठलाही वाद नसताना या वृद्ध दांपत्याने आत्महत्या केल्यामुळे त्या मागील नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा विचार करता गत पाच महिन्यात ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या मे महिन्यात झाल्याची नोंद आहे.
शेतात पऱ्हाटीचे सरण रचून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 4:52 PM