लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक कोविड रुग्णालयासह कोविड केअर सेंटर अपुरे पडत आहे. त्यामुळे खामगाव येथील वाढीव रुग्ण शेगाव येथे हलविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे खामगाव येथे अतिरिक्त बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.खामगाव तालुक्यासह परिसरात गत आठवड्यापासून कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. खामगाव शहरातील रुग्णांनी दुहेरी आकडा गाठला आहे. त्याचप्रमाणे घाटाखालील संग्रामपूर तालुका वगळता उर्वरित पाचही तालुक्यांत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढती आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खामगाव येथील ५० बेड क्षमतेचे कोविड रुग्णालय कधीचेच हाऊसफुल्ल झाले आहे. या रुग्णालयात १० बेडची क्षमता वाढविण्यात आली आहे. मात्र, तरीही कोविड रुग्णालय अपुरे पडत असल्याने, वाढीव रुग्णांना पिंपळगाव राजा रोडवरील मुलांच्या वस्तिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येत आहे. मात्र, शुक्रवारी सायंकाळी हे कोविड केअर सेंअरही हाऊसफुल्ल झाले. रुग्णांची वाढीव संख्या पाहता खामगाव येथील जलंब रोडवर तसेच इतरत्र १५०-२०० बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याच्या हालचाली आहेत.
खामगावातील कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर पडतेय अपुरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 11:22 AM