लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघासाठी एक डिसेंबर रोजी मतदान होत असून मतदानाची प्रक्रिया पारपाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या १५० कर्मचाऱ्यांची मतदानाच्या दोन दिवस अगोदर कोवीड चाचणी करण्यात येणार आहे. संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रशासकीय यंत्रणा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही, यादृष्टीने सतर्कता बाळगून आहे.यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी स्पष्टपणे अनुषंगीक निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागातील वरिष्ठ सुत्रांनी दिली. एक डिसेंबर रोजी प्रत्यक्ष अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या एकाजागेसाठी जिल्ह्यात १४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत ही मतदान प्रक्रिया पारपडणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ४८४ मतदार असून विभागात यवतमाळ, अमरावती नंतर बुलडाण्यात सर्वाधिक मतदार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मतदान केंद्राधिकाऱ्यासह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जवळपास १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची मतदानाच्या पूर्वी किमान दोन ते तीन दिवस अगोदर कोवीड चाचणी करून घेण्याच्या सुचना ही विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील १५० अधिकारी कर्मचाऱ्यांची ही कोवीड चाचणी होणार आहे. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची निवडणूक विभागाने यादी मागवली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
पोलिंग एजन्टचीही चाचणीमतदान केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या पोलिंग एजन्टचीही कोवीड चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुषंगाने पोलिंग एजन्टचीही यादी निवडणूक विभागाने मागितली आहे. याबाबत दोन दिवसापूर्वीच विभागीय आयुक्तांनी अनुषंगीक सुचना दिल्या आहेत. सोबतच कोवीड जनजागृती संदर्भातील पोस्टरही मतदान केंद्राबाहेर असणे गरजेचे आहे. दरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसंगी संदिग्ध रुग्ण आल्यास पीपीई किटचीही उपलब्धतता कण्यात आली आहे. तसेच कोवीड बाधीत मतदारासाठी पोस्टल बॅलेट उपलब्ध करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.