- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात गत महिनाभराच्या कालावधीत १,२४३ जणांनी कोविड लसीचा डोस घेतला. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी ३९ जणांचे लसीकरण झाले. पहिल्या टप्प्यातील लसीकरणानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणानेही वेग घेतला आहे.कोविड लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर काहींना लसीमुळे रिअॅक्शन दिसून आली. परंतु त्याचा वाईट परिणाम झाला नाही. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत १,२०४ लाभार्थींना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यानंतर सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यात सोमवारी ३९ जणांना लस देण्यात आली. लसीकरणाची प्रक्रिया सुरूच असून, आरोग्य कर्मचारी, पोलीस, नगर पालिका कर्मचाऱ्यांनंतर ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
३९ लाभार्थींना लसीचा दुसरा डोसबुलडाणा जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात होऊन ३० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ज्या लाभार्थींनी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लस घेतली, अशा ३९ जणांना सोमवारी लसीचा दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी नीलेश टापरे यांचा समावेश होता.
कोविड लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ३९ जणांना लस देण्यात आली. यासोबतच मिक्स सेशनअंतर्गत आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाइन वर्कर यांनादेखील लसीचा डोस दिला जाणार आहे.- डॉ. नीलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव.