मलकापूर : अवैधरित्या रेती उपसा व उत्खनन प्रकरणी महसुल प्रशासनाने आरसीपी पथक दसरखेड एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने पुर्णा नदीपात्रात धाडी टाकत दोन ठिकाणांवरून पोकलेन मशीन, दोन बोटी, रेतीसाठा यासह इतर साहित्य मिळून तब्बल ५७ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही धाडसी कारवाई तहसिलदार विजय पाटीलसह चमुने ९ जानेवारीच्या मध्यरात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत चालली. या कारवाईने वाळु माफीयांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.मौजे नरवेल शिवारातील पूर्णा नदीपात्रातून विना परवानगी स्वयंचलीत बोटी बसवून त्याव्दारे अवैध उपसा करून रेतीसाठा उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती महसुल प्रशासनाला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे महसुल प्रशासनाने दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.नि. माधवराव गरूडसह पोलीस चमु व आरसीपी कमांडो पथकाची मदत घेत तात्काळ कारवाईबाबत नियोजन आखले.त्यानुसार महसुल प्रशासनाने रात्री ११.३० वाजेच्या सुमारास नरवेल परिसरातील कोटेश्वर मंदीर परिसरासमोरील नदीपात्रात धाड टाकीत येथून एक लोकलेन मशीन व सहा ब्रास रेतीसाठा असा ४५ लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईनंतर लगेच रात्री १.३० वाजता हिंगणा-नागापूर परिसरातील नदीपात्रात धाड टाकुन येथून वाळू उत्खनन करीता उभ्या असलेल्या दोन स्वयंचलीत बोटी, ५० ब्रास रेतीसाठा, ४० ड्रम, १८ नग लोखंडी पाईप असा १२ लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकंदर या मध्यरात्री चाललेल्या दोन्ही कारवाईत प्रशासनाने एकुण ५७ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची धाडसी कारवाई केली.या कारवाईत तहसिलदार विजय पाटील, मंडळ अधिकारी सर्जेराव साळवे, तलाठी नितीन धाडे, मनोज एदलाबादकर, चालक दिलीप तायडे, तसेच पो.नि. माधवराव गरूड, ६ पोलीस कर्मचारी व आरसीपी पथकातील सात कमांडो आदिंचा प्रामुख्याने सहभाग होता. यानंतर आज १० जानेवारी रोजी सकाळी तहसिलदार विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी पोकलेन चे चालक वाहक व इतर सहकार्याविरूध्द भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दुपारी ३ वाजेच्या सुमारास निवासी नायब तहसिलदार गजानन राजगडे, मंडळ अधिकारी पी.के.पाटील, तलाठी बाळु जाधव, संतोष पारस्कर, धनंजय तालीमकर, निलेश म्हात्रे, दिलीप तायडे आदी चमु रात्रीच्या धाडसी कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य नदीपात्रातून दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनला जमा करण्याची कार्यवाही करीत आहेत. (प्रतिनिधी)