खामगाव : मेंढपाळांना चराईसाठी ग्रेझिंग कॉरिडॉर्स तयार करा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मेंढपाळ पुत्र आर्मीकडून सोमवारी खामगावात आक्रमक मोर्चा काढण्यात आला. स्थानिक भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने केल्यानंतर माेर्चाद्वारे मेंढपाळ पुत्र आर्मीचे पदाधिकारी शहर पोलिस ठाण्यामार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध १३ मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनानुसार, मेंढपाळांच्या विविध न्याय मागण्यांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मेंढपाळांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मेंढपाळांना चराईसाठी ग्रेझिंग कॉरिडॉर्स तयार करावे, मेंढपाळ आणि शेळ्या मेंढ्यांसाठी स्वतंत्र एकत्रित विमा योजना सुरू करावी. इंग्रजकालीन भारतीय वन कायदा १९२७ अन्वये बंदी घातलेले वन चराई अधिकार उठवा, राज्यभर पशुपालक मेंढपाळ समुहाला वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत चराईसाठी कुरणे विकास धोरणे राबवावीत, वन विभागाचा मेंढपाळ बांधवांवरील अन्याय थांबवून खोट्या केसेस मागे घ्याव्या, काही केसेस उद्द कराव्या, शेळ्या-मेंढ्यांच्या आकस्मिक मृत्यूची नुकसानभरपाई मिळावी, मेंढपाळबहुल तालुक्यात शेळ्या-मेंढ्यांचे मोबाइल हाॅस्पिटल सुरू करावे.
नैसर्गिक आपत्तीपासून रक्षणासाठी अत्याधुनिक तंबू वितरित करावे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी- मेंढी विकास महामंडळामार्फत मेंढपाळ समुहातील पशू साथी नेमावे, त्यांच्या माध्यमातून शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी. पुणे स्टेशनला शिंग्रोबा मेंढपाळ धनगराचे नाव द्यावे, सोबतच मेंढपाळांच्या पारंपरिक चराई जमिनीवर वन संवर्धनाच्या नावाखाली होत असलेल्या तारेच्या कुंपणाचे काम त्वरित थांबवा, २०१९ साली खामगाव तालुक्यातील मृत झालेल्या मेंढरांच्या रखडलेल्या मदतीचे वाटप करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक सौरभ हटकर यांनी केले. मोर्चात जिल्हाध्यक्ष वैभव हटकर यांच्यासह खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.