मेहकर/देऊळगाव राजा: गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, रा. आळंद, ता. देऊळगाव राजा) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) यांच्या पार्थिवावर ३ मे रोजी दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवनांच्या अंत्यदर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेड नजीक नक्षलींनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ जवान शहीद झाले होते. त्यात बुलडाणा जिल्ह्याच्या दोन जवानांचाही समावेश होता. या घटनेत शहीद झालेल्या जवानांना गडचिरोली येथे २ मे राजी श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर त्यांचे पर्थिव ३ मे रोजी बुलडाणा जिल्ह्यात पोहचले. दरम्यान, शहीद जवान राजू नारायण गायकवाड यांचे पार्थिव मेहकर येथे आल्यानंतर दुपारी १२.३० वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तर सर्जेराव उर्फ संदीप यांचे पार्थिव हे देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथे आनल्यानंतर शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप खार्डे यांचे चुलत भाऊ समाधान खार्डे यांनी मुखाग्नी दिला. शहीद जवान राजू गायकवाड यांच्या पार्थिवावर जानेफळ रोडवरील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आळंद येथे शहीद जवान संदीप खार्डे यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला बुलडाणा पोलीस दलाचे अधिकारी, कमांडे पथक, लोकप्रतिनिधी व परिसरातील महिला व पुरूषांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीशहीद जवान राजू गायकवाड व संदीप खार्डे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी जमली होती. यावेळी नक्षलवादाच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. नक्षलवाद नष्ट कर, अशा घोषणा देऊन प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत झाल्याचे चित्र दिसून आले.