बुलढाणा/मेहकर: विदर्भाच्या रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तथा वर्तमान स्थितीत बांग्लादेश क्रिकेट असोसिएशनचे चिफ क्युरेटर असलेल प्रवीण हिंगणीकर (रा. विवेकानंद नगर, नागपूर) यांच्या कारला मेहकर नजीक अपघात होऊन त्यात त्यांची पत्नी सुवर्णा यांचा (५३) जागीच मृत्यू झाला तर प्रवीण हिंगणीकर हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात १८ एप्रिल रोजी दुपारी घडला.
प्रवीण हिंगणीकर व त्यांची पत्नी सुवर्णा हिंगणीकर हे दोघे पुण्यावरून नागपूरकडे कारने (एमएच-३१-एफए-६६२२) जात होते. दरम्यान समृद्धी महामार्गावर मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमआर-५५-एएल ०६१८ क्रमांकाच्या कंटेनरला या कारने मागील बाजूने जबर धडक दिली. त्यामध्ये सुवर्णा हिंगणीकर यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रवीण भास्करराव हिंगणीकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णवाहीकेद्वारे मेहकर ग्रामीण रुग्णालात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर चेनेंज क्रमांक २८९ वर हा अपघात झाला. कार चालकाला वाहन चालवितांना डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिकस्तरावर सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर बचाव पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून दोघांनाही मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे सुवर्णा हिंगणीकर यांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. मेहकर पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य पहाता घटनास्थळ गाठून मदत कार्य केले. यावेळी मदत कार्यात एपीआय अरुण बकाल, एनपीसी मुकेश जाधव, पीसी मिलींद ताकतोड यांनी जखमींना रुगणालयात पाठविण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.