मोताळा : तालुक्यातील निलंबित तलाठी एन. टी. उज्जैनकर यांनी बोगस लाभार्थ्यांना अनुदान वाटप करून ४२ लाख ३६ हजार रुपयांचा घोटाळा केल्याची बाब चौकशीअंती समोर आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी संबंधित तलाठय़ाविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरार आहे. मोताळा तालुक्यातील निलंबित तलाठी एन. टी. उज्जैनकर यांनी सन २0१२ ते २0१५ दरम्यान शेतकर्यांसाठी मिळालेल्या शासकीय अनुदान वाटपात घोळ केला आहे. त्यांनी भूमिहीन लोकांना शासकीय अनुदान वाटप केले. तसेच एकाच लाभार्थ्याला वेगवेगळय़ा गावात जमीन नसतानासुद्धा अनुदान दिले. एकत्र कुटुंबातील सदस्यांना जमिनीचे वाटणीपत्रक नोंद घेण्याच्या पहिलेच वेगवेगळे दाखवून शासकीय अनुदान वाटप केले. त्याचप्रकारे एकाच खातेदाराला पुन्हा-पुन्हा अनुदान वाटप केल्याची बाब चौकशीअंती समोर आली आहे. या गैरप्रकारातून तलाठी उज्जैनकर यांनी ४२ लाख ३६ हजार रुपयांच्या शासकीय अनुदानाचा अपहार करून शासनाची फसवणूक केली आहे. शनिवारी १६ मे रोजी चौकशी समितीने याविषयीचा अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर केला. अहवालाचे निरीक्षण करून जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणातील संबंधित दोषीविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी मोताळा येथील तहसीलदार रमेश पवार यांनी बोराखेडी पो. स्टे. ला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी निलंबित तलाठी एन. टी. उज्जैनकर यांच्या विरोधात कलम ४२0, ४६८, ४७१, ४0९, १६६, १६७ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार दीपक कोळी करीत आहे.
‘त्या’ निलंबित तलाठय़ाविरोधात गुन्हा
By admin | Published: May 18, 2015 1:47 AM