देऊळगाव राजा : तालुक्यातील निमगाव गुरू येथील ग्रामपंचायतीमध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत सरपंच व सचिव यांनी अफरातफर केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर भालेराव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अनियमितता झाल्याचे समाेर आल्याने तत्कालीन सरपंच व सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमगाव गुरू येथील ग्रामपंचायतीमध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत सरपंच व सचिव यांनी अफरातफर केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर भालेराव यांनी केली हाेती. या तक्रारीची चाैकशी करण्यात आली असून यामध्ये शौचालय बांधकाम, समाज मंदिर दुरुस्ती, नाली दुरुस्ती, अंगणवाडी कपाट, एलईडी लाईट, अंगणवाडी खेळणी खरेदी, ई- लर्निंग, कॉम्पुटर दुरुस्ती करणे यामध्ये १ लाख ५७ हजार ८६५ रुपयांची अनियमितता आढळून आली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुभाष आत्माराम गडाख यांच्यामार्फत देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये निमगाव गुरूच्या तत्कालीन सरपंच राधा अनिल चित्ते व ग्रामसेवक एस.पी. मोरे यांच्याविरोधात पोलीस स्टेशन येथे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण पोलिसांनी चौकशीवर ठेवले होते. तब्बल दोन महिन्यांनंतर पाेलिसांनी भादंवि कलम ४०९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.